रोप तयार करणे
कांदा रोपवाटिकेची जागा विहिरी जवळ असावी, म्हणजेच वेळीच पाणी देणे सोपे होते. निरोगी रोपे तयार करण्याच्या दृष्टीने रोपे नेहमी गादी वाफ्यावरच तयार करावीत, कारण गादीवाफ्यावर रोपांची वाढ एकसारखी होते, मुळांच्या भोवती पाणी फार काळ साचुन राहत नाही त्यामुळे रोपे कुजणे, सडणे हे प्रकार होत नाहीत आणि मुळांद्वारे अन्नद्रव्याचे शोषण चांगले होवून रोपांची गाठी जड व लवकर तयार होतात.
एक हेक्टर कांदा लागवडीसाठी साधारणपणे ५-६ गुंठे क्षेत्रावरील रोपे पुरेसी होतात. रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे १ मीटर रुंद, ३ मीटर लांब व १५ से.मी. उंच असावेत आणि वाफा नेहमी भुसभुशीत असावी. गादी वाफे नेहमी उताराला आडवे करावेत. प्रत्येक वाफ्यात १-२ घमेले चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत व २५० ग्रॅम १५:१५:१५ किंवा १९:१९:१९ खत त्याचबरोबर ५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड व २० ग्रॅम कार्बारील भुकटी यांचे मिश्रण मिसळून १० से.मी. अंतरावर उथळ रेषा ओढून पातळ बियाणे प्रति वाफ्यात १५ ग्रॅम या प्रमाणे पेरणी करावी. वाफ्यातील दगड किंवा बारीक डेकळे वेचून घ्यावेत आणि वाफा सपाट करावा.
वाफ्याच्या रुंदीशी समांतर चार बोटे अंतरावर काडी अथवा खुरप्याच्या सहाय्याने १-१.५ से.मी. खोलीपर्यत रेघा पाडाव्यात आणि त्यात पातळ बी पेरून मातीने झाकून टाकावे. पहिले पाणी जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने द्यावे. त्यानंतर पाणी बेताने ७-८ दिवसाच्या अंतराने द्यावे. रोपांच्या ओळीमधील माती हलवून घ्यावी, म्हणजे रोपाच्या मुळाभोवती हवा खेळती राहते. रोपांच्या ओळीमधील माती हलवून घ्यावी. त्यानंतर पाणी बेताने ७-८ दिवसाच्या अंतराने द्यावे. रोपांच्या ओळीमधील माती तयार झाली म्हणजे पुर्नलागवडीसाठी रोपे तयार झाले असे समजावे. रब्बी हंगामातील कांद्याची रोपे ८-९ ( ५० ते ५५ दिवस) आठवड्यात लागवडीसाठी तयार होतात. पाने पिवळी पडल्यास १% युरिया (१०० ग्रॅम युरिया १० लिटर पाण्यात मिसळून) अथवा २% डीएपी (२०० ग्रॅम डीएपी १० लिटर पाण्यात मिसळून)चा फवारा द्यावा.
रोपवाटीकेतील रोग व किड नियंत्रण
रोपवाटिकेत मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. याकरिता बी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४-५ ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा २-३ ग्रॅम थायरम अथवा कॅप्टन किंवा बाविस्टिन हे बुरशीनाशक चोळावे. साधारणपणे प्रत्येक चौरसमीटर क्षेत्रात १० ग्रॅम बी पेरावे. रोप तयार होत असताना त्यावर फुलकिडे व शेंडे जाळणे या रोगाचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास फिप्रोनील १ मि.ली. किंवा प्रोफेनोफॅास १ मि.ली. प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी. काळा करपाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब १ ग्रॅम, जांभळा व तपकिरी करपा नियंत्रणासाठी ट्रायसायक्लॅझोल १ किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी.
कांद्याची पुर्नलागण करताना रोपे काढण्यापूर्वी २४ तास अगोदर गादी वाफ्याला पुरेसे पाणी द्यावे म्हणजे रोपे उपटतांना मुळांना इजा होणार नाही. पुर्नलागण करतान रोपे १० लिटर पाण्यात २० मिली कार्बोसल्फान व १० ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून त्या रोपांची मुळे दीड ते दोन तास बुडवुन ठेवावीत त्यानंतर अॅसटोबेक्टर व पीएसबी या जैविक बुरशीनाशकाच्या द्रावणात रोप बुडवुन नंतर लागवड करावी. रोपवाटिकेत तणनाशकाचा वापर टाळावा. रोग व व किडींचा वेळेवर बंदोबस्त करणे आवश्यक आहे. रब्बी हंगामासाठी एन-२-४-१, अर्क निकेतन, फुले सफेद, फुले सुवर्णा या वाणांची निवड करावी.
रब्बी हंगामातील कांदा लागवड
•वाण- एन-२-४-१, अॅग्री फाउड लाईट रेड, अर्का निकेतन, फुले सफेद, फुले सुवर्णा
•रोपे तयार करण्याचा महिना- ऑक्टोबर-नोव्हेंबर
•कांदा रोप पुन: लागवडीचा महिना- नोव्हेंबर- डिसेंबर
•कांदा काढणी- एप्रिल- मे
•पातीच्या वाढ- ६५-७० दिवसात
•कांदा पोसण्यासाठी ५५-६० दिवस
•पुर्नलागण केल्यानंतर १३५- १४० दिवसात काढणी
•साठवण क्षमता जास्त
•उत्पादन ३०-३५ टन
लेखक - ऐश्वर्या राठोड, आचार्य पदवी विद्यार्थी, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी मो. ८४११८५२१६४
डॉ. आदिनाथ ताकटे मृदा शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी. मो. ९४०४०३२३८९
Published on: 02 November 2023, 06:12 IST