राज्यातील पश्चिम भागात अनेक शेतकरी कांदा लागवड करत असतात, येथील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कांदा पिकावर अवलंबून असल्याचे चित्र नजरेस पडते. पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात कांदा पिक नजरेस पडते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कांदा पिकावर जास्त अवलंबून आहेत, असे असतानाच जिल्ह्यातील चाकण भागातील कांदा उत्पादक शेतकरी यावेळी कवडीमोल दर प्राप्त होत असल्याने कमालीचा नाराज असल्याचे समजत आहे. बुधवारी म्हणजे 19 तारखेला चाकण मधील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या लिलावात कांद्याला हजार रुपये ते 2,700 रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाजार भाव प्राप्त झाला. या दिवशी चाकणच्या बाजारपेठेत सुमारे आठ हजार क्विंटल कांद्याची आवक नमूद करण्यात आली. बाजारपेठेत मिळत असलेला कांद्याचा हा दर कवडीमोल असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बुधवारी चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत, सकाळ सत्राच्या लिलावामध्ये कांद्याला मात्र पंधराशे रुपये प्रति क्विंटल एवढाच बाजार भाव प्राप्त झाला होता. तर दुपारच्या सत्रात झालेल्या लिलावात कांद्याला 2700 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव प्राप्त झाला. पुणे जिल्ह्यातील या भागात बहुतांश शेतकरी कांदा पिकावर अवलंबून आहेत, मात्र गेल्या अनेक वर्षापासून कांद्याला अतिशय कमी बाजार भाव प्राप्त होत असल्याने येथील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडतांना दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांद्याला कधी ना कधी विक्रमी बाजार भाव प्राप्त होईल या आशेने दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करत आला आहे. मात्र, कांदा पिकाला प्राप्त होत असलेला कवडीमोल दर शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फेरतांना दिसत आहे. कांदा पिकाला बेभरवशाचे पीक म्हणून का संबोधले जाते त्याची प्रचिती या परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात यावर्षी परतीच्या पावसाने हजेरी लावली होती, परतीच्या पावसाच्या आगमनाने जमिनीचा वाफसा होत नव्हता परिणामी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड करण्यास पसंती दर्शवली.
मात्र कांदा पिकाला अपेक्षा सारखा भाव प्राप्त होत नसल्याने, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असे असले तरी कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मते, जेव्हा चांगल्या दर्जाचा गावरान कांदा बाजारात येईल तेव्हा कांद्याला चांगला बाजारभाव प्राप्त होण्याची शक्यता आहे.
Published on: 20 January 2022, 10:00 IST