कांदा हे एक नगदी पिक आहे, आणि याची लागवड राज्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. नाशिक जिल्ह्यात कांदा एक मुख्य पीक आहे. जिल्ह्यातील विशेषता कसमादे परिसरातील शेतकरी कांदा पिकावर जास्त अवलंबून असतात. कांदा हे जरी नगदी पीक असले तरी याला बेभरवशाचे पीक म्हणून शेतकरी बांधव संबोधत असतात, याचे प्रमुख कारण म्हणजे याच्या दरात नेहमी चढ-उतार बघायला मिळते. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात अर्थात कसमादे पट्ट्यात रब्बी हंगामातील कांदा लागवडीची सध्या लगबग बघायला मिळत आहे. आणि परिसरातील शेतकऱ्यांना कांदा लागवडीसाठी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे, यापैकी प्रमुख संकट हे मजूर टंचाईचेच आहे.
जिल्ह्यात सर्वत्र वेळेत कांदा लागवड व्हावी म्हणून शेतकरी जलद गतीने कार्य करीत आहेत. एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांची कांदा लागवड आल्याने मजुरांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. कसमादे परिसरात एवढी बिकट परिस्थिती बनली आहे की, अनेक कांदा उत्पादक शेतकरी रात्रपाळी करून कांदा लागवड करीत आहेत. मजूर रात्रपाळीसाठी एक्स्ट्रा मजुरीची मागणी करतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात अजूनच वाढ होत आहे. एकंदरीत कसमादे परिसरात कांदा लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत, तसेच जिल्ह्यात कांदा लागवडीचे क्षेत्र कमालीचे वाढताना दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भविष्यातील कांद्याच्या दराबाबत शंका-कुशंका घर करू लागल्या आहेत.
मागील काही वर्षापासून शेत मजुरांची मजुरी ही लक्षणीय वाढली आहे, यावर्षी तर त्यात अजूनच वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. मागच्या वर्षी कांदा लागवडीसाठी दोनशे रुपये रोज अशी रोजंदारी होती, मात्र यंदा यात अजून वाढ होऊन रोजंदारी ही तीनशे रुपये दिवस अशी झाली आहे. कांदा लागवड करण्यासाठी तीनशे रुपये रोजंदारी असली तरी जे मजूर रात्री कामासाठी येतात त्यांना यात अजून वाढ करून मजुरांना मजुरी द्यावी लागत आहे. आधीच बियाणांचे, खतांचे, कीटकनाशकांची भाव गगनाला भिडले आहेत आणि आता त्यात मजुरी देखील वाढली आहे त्यामुळे कांदा लागवडीसाठी येणारा खर्च हा चांगलाच वधारला आहे. एकंदरीत कांदा लागवडीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांदा लागवडीसाठी एवढा आटापिटा करून भविष्यात कांद्याचे दर शेतकऱ्यांना हसवतील की रडवतील हे बघावे लागेल.
शेतकरी कोमात मजूर जोमात….!
कसमादे परिसरात कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत आहे, म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मजुरांना जास्त मजुरी तर द्यावीच लागत आहे, याशिवाय त्यांना शेतात घेऊन येणे, त्यांना परत घरी सोडणे शिवाय त्यांना मजुरी पेक्षा आगाऊ पैसे उसनवारीने देणे यासारख्या सेवादेखील बजवाव्या लागत आहेत. म्हणून कांदा लागवड करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आलेत तर मजूर वर्गाची चांदी होत आहे असेच म्हणावे लागेल.
Published on: 31 December 2021, 10:51 IST