भारतात कांदा लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते तसेच भारतातील कांद्याची निर्यात देखील खुपच लक्षणीय आहे. भारतात अनेक राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात कांद्याची लागवड ही इतर राज्याच्या तुलनेत अधिक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा कांदा आणि द्राक्षे लागवडीसाठी तर पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. खान्देश प्रांतात देखील कांद्याची लागवड लक्षणीय आहे. महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन अधिक असल्याने येथे कांद्यासाठी चांगले मार्केट्स देखील उपलब्ध आहेत.
महाराष्ट्रातील लासलगाव कांद्याचे मार्केट हे भारतातील सर्वात मोठे कांदा मार्केट म्हणुन ओळखले जाते लासलगाव पाठोपाठ पिंपळगाव (बसवंत) कांदा मार्केटचा नंबर लागतो. नाशिक जिल्यातील हे मार्केट सद्धया शेतकऱ्याच्या बैठकीतील एक चर्चेचा विषय ठरत आहे. हे मार्केट चर्चेमध्ये राहण्याचे कारण म्हणजे गेल्या एक ते दोन महिन्यापासून ह्या मार्केट मध्ये कांद्याला इतर मार्केट पेक्षा अधिक भाव मिळत आहे. ह्यावेळी ह्या कांदा मार्केट मध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील ह्या मार्केट मध्ये कांद्याच्या भावात तेजी पाहायला मिळाली. इतर बाजार समितीच्या तुलनेत इथे किमान व कमाल भावात लक्षणीय फरक पाहवयास मिळाला. नेमक ह्या मार्केट मध्ये तेजी का बघवयास मिळते? हा प्रश्न आपणास ही पडला असेल. नेमक काही तरी ह्यामागे ठोस कारण असेल.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, नाशिक जिल्ह्यात उत्तम दर्जाचे कांद्याचे उत्पादन घेतले जाते, विशेषता पिपंळगावच्या (बसवंत) आजूबाजूच्या परिसरातील कांदा हा खुपच चांगल्या क्वालिटीचा असतो. नाशिक जिल्ह्यात कांदा लागवडीसाठी अनुकूल वातावरण आहे त्यामुळे कांदा हा उत्तम दर्जाचा पिकतो तसेच उत्पादन देखील जास्त येते. नाशिक जिल्ह्यातील माती आणि पाणी कांदा वाढीसाठी खुप योग्य असल्याचे सांगितलं जाते. पिंपळगाव कांदा बाजारात कांद्याचा भाव जास्त आहे म्हणजे इथे कांदा आवक कमी आहे असे नाही. कांद्याची आवक ही पिंपळगावमध्ये चांगली आहे पण मार्केट मध्ये येणारा कांदा हा चांगल्या क्वालिटीचा असल्याने येथे कांद्याला चांगला भाव मिळत आहे.
कांद्याची क्वालिटी चांगली राहण्याचे नेमके कारण
नाशिक जिल्यात कांदा पिकासाठी चांगले वातावरण आहे शिवाय येथील शेतकरी कांद्याचे चांगले बियाणे वापरतात. साधारणपणे शेतकरी कांद्याचे बियाणे हे बीज केंद्रात जाऊन खरेदी करतात त्यामुळे काही वेळेस बियाणे हे खराब निघते आणि उत्पादनात घट घडून येते याशिवाय ह्या अशा बियाण्यामुळे कांद्याची क्वालिटी ही खराब होते. पण नाशिक जिल्ह्यात बहुतेक शेतकरी कांदा लागवडीसाठी घरी तयार केलेले बियाणे वापरतात त्यामुळे कांद्याची रोपे चांगली निघतात आणि परिणामी कांदा उत्पादनात चांगली वाढ होते. म्हणुन नाशिक जिल्ह्यात कांदा हा चांगला पिकतो आणि त्यामुळेच पिंपळगाव कांदा मार्केटमध्ये ह्यावर्षी कांद्याला चांगला भाव मिळत आहे.
पिंपळगावात कुठून कुठून येतो कांदा
पिंपळगावं मार्केट मध्ये कांद्याची आवक ही नेहमी चांगलीच बनलेली असते. पिंपळगाव मध्ये कांदा हा कसमादे (कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा) पट्ट्यातून जास्त येतो. तसेच पेठ सुरगाणा, चांदवड, येवला ह्या भागातूनही कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात असते. मालेगाव मधून मोठया प्रमाणात शेतकरी आपला कांदा पिंपळगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी नेतात आणि ह्याच प्रमुख कारण म्हणजे पिंपळगाव मार्केट मध्ये कांद्याच्या चांगल्या मालाला चांगला भाव मिळतो. अनेक शेतकरी येथून कांदा बिजनिर्मितीसाठी म्हणजे उळे(कांद्याची रोपे) तयार करण्यासाठी नेतात. कांद्याच्या बियाण्याची किंमत ही सरासरी चार हजार रुपये किलोच्या घरात असते.
लासलगाव आणि पिंपळगाव मार्केटमधील भावातील अंतर
या महिन्यात 2 ऑक्टोबर रोजी आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजेच नाशिक जिल्यातील लासलगाव बाजारपेठमध्ये कांद्याचा किमान भाव 1000 रुपये, मॉडेल किंमत 2970 आणि कमाल भाव 3101 रुपये प्रति क्विंटल होता.
तर त्याच दिवशी नाशिक जिल्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणजे पिंपळगाव बाजारपेठेत किमान भाव हा 1500 रुपये होता आणि कमाल भाव हा 3753 रुपये प्रति क्विंटल एवढा होता.
काल म्हणजे सोमवारी 18 ऑक्टोबर रोजी लासलगाव बाजारपेठेत कांद्याला किमान भाव हा 900 रुपये मिळाला, तसेच कमाल भाव हा 3639 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला. आणि कांद्याला ह्याच दिवशी पिंपळगावात किमान भाव 1700 रुपये होता तर कमाल भाव 4001 रुपये एवढा विक्रमी होता. ह्यावरून हे स्पष्ट होते की पिंपळगाव बाजारपेठेत कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळत आहे. आणि जर कांदा चांगल्या क्वालिटीचा असला तर भाव हा ह्या बाजारपेठेत नेहमी चांगलाच असतो. कांद्याच्या ह्या भावामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होत आहे.
Published on: 19 October 2021, 07:28 IST