मुंबई : कांदा शेती म्हटलं म्हणजे एक लॉटरीच समजली जाते. ज्या शेतकऱ्यांना मार्केटचं व्यवस्थित ज्ञान असलं तर त्यांना कांदा शेतीत नफा हा मिळतच असतो. पण बऱ्याच वेळा आपण कांदा पिकवला आणि बाजारात विक्रीसाठी नेला तर भाव कमी झालेले आपल्याला दिसत असतात. त्यावेळी शेतकरी एकतर मिळेल त्या भावात कांदा देऊन मोकळा होत असतो किंवा आपल्या चाळीत राखून ठेवतो. पण चाळीत ठेवल्यानंतर नेहमी त्याची देखरेख केली जात नसल्याने आणि चाळीची बांधणी शास्त्र पद्धतीने नसल्याने कांदा खराब होत असतो. म्हणजेच दोन्ही बाजूने शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सोसावे लागते.
कांदा चाळीत पारंपरिक पद्धतीने कांदा साठवला जातो. सरकारकडून यासाठी अनुदानही दिलं जातं. पण या पारंपरिक पद्धतीने कांदा साठवल्याने काही कांदा हा खराब होतो. तर काही कांद्यांना कोंब फुटतात. त्यामुळे शेतकऱ्याची मेहनत वाया जाते. पण यावर हरियाणातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने रामबाण उपाय शोधून काढला आहे, जो की यशस्वी ठरला आहे.
सुमेर सिंग असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सुमेर हे हरियाणातील भिवानीतील ढाणी माहूत येथे राहतात. ते गेल्या 22 वर्षांपासून शेती करतायेत. शेतकऱ्यांना परवडेल आणि कांदा जास्तीत जास्त महिने टिकेल असा मार्ग यांनी सांगितला आहे.
कांदा साठवण्यासाठी काय केलं?
सुमेर सिंग यांच्या शेतात शेड आहे. या शेडमध्ये त्यांनी कांदे कापडी दोरीने बांधून ठेवेलेत. सुमेर म्हणतात. "कांदे विक्रीसाठी पोत्यात एकावर एक असे भरले जातात. कांदे उष्ण असतात. त्यामुळे दाबामुळे कांदे खराब होतात. एखादा कांदा जरी खराब असला तरी इतर कांदेही खराब होतात. पण आमच्या साठवणूक पद्धतीमुळे कांदा खराब होण्याची शक्यताच कमी झाली आहे. तसेच जर एखादा कांदा खराब झाला असेल तर ते ही समजू शकेल", असा विश्वास सुमेर सिंग यांनी व्यक्त केला आहे. सुमेर सिंग यांनी सेंद्रीय पद्धतीने कांद्यांचे उत्पादन घेतले आहे.
काढणीनंतर सुमेर यांनी कांदे पातीसह एकत्र बांधले. त्यानंतर ते शेतातील शेडमध्ये दोरीने टांगून ठेवले, ज्याप्रमाणे बाजारात दुकानदार केळी लटकवून ठेवतात. या पद्धतीने कांदे लटकवल्याने ते सुरक्षित राहतात तसेच खराबही होत नाही. त्यामुळे कांदे जास्त काळ टिकतात."सुमेर यांच्या या कांदा साठवणीच्या पद्धतीमुळे कांदे अधिक काळ टिकतात. त्यामुळे ते कोरडे होण्यास मदत होते. कांदे कोरडे होताच त्याचे बाहेरील पापुद्रे काढून टाका. त्यानंतर पुन्हा ते लटकवा. या प्रकारे कांदे जवळपास वर्षभर टिकवून ठेवू शकतो", असा काही कृषी तज्ज्ञांचा दावा आहे.
कांद्याला अधिक दर
सुमेर यांना या पद्धतीने कांदा साठवल्याने प्रति किलो मागे 10 रुपयांचा फायदा झाला आहे. सुमेर म्हणतात, "मी आतापर्यंत प्रति किलो 25 रुपये या दराने एकूण 25 क्विंटल कांदा विकला आहे. तोच कांदा आता मी 35 रुपये किलो या भावाने विकत आहे. कांद्याची लागवड करण्यासाठी मला 55 हजार रुपये खर्च झाला. कांदा विक्रीतून माझा उत्पादन खर्च निघाला आहे. आता मला फायदा होत आहे.
सुमेर यांचा शेतकऱ्यांना संदेश
"सेंद्रीय शेती किंवा रासायनिक शेती दोन्ही प्रकारात जोखीम आहेत. पण म्हणून शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करायचेच नाहीत, अशातला भाग नाही. सर्व शेतकरी बांधवांनी सेंद्रीय शेतीची कास धरावी", असे आवाहन सुमेर यांनी केले आहे.
Published on: 27 June 2021, 08:40 IST