News

कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारल्यापासून त्यावर तोडगा काढण्यासाठी बैठका होत होत्या. पण त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र काल पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली.

Updated on 03 October, 2023 12:11 PM IST

Onion Update : नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव मागील १३ दिवसांपासून बंद होते. मात्र त्यावर अखेर पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन तोडगा काढला आहे. त्यामुळे आजपासून (दि.३) नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव पूर्ववत झाले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारल्यापासून त्यावर तोडगा काढण्यासाठी बैठका होत होत्या. पण त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र काल पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात भुसे यांनी व्यापाऱ्यांना एका महिन्यात तोडगा काढला जाईल, असं आश्वासन दिलं आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांनी आजपासून कांदा लिलाव सुरळीत सुरु केले आहेत.

कांदा लिलाव सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान कांदा लिलाव सुरु झाले असल्याची माहिती अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नसल्याने मोजकीच कांद्याची आवक बाजारात होत आहे. गेल्या १३ दिवसांपासून व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेऊन बंद पुकारलेला होता. या बंदमध्ये नेमकं साध्य काय केलं? असा सवाल उपस्थित होत असून याच समाधानकारक उत्तर व्यापाऱ्यांकडे नसल्याचे समोर येतं आहे.

कांदा व्यापाऱ्यांनी केलेली शेतकऱ्यांची कोंडी आणि लिलाव बंद यावर तोडगा काढण्यासाठी सुरुवातीला व्यापाऱ्यांची बैठक, मंत्री मंडळाची बैठक, पालकमंत्र्यांची बैठक, शेतकऱ्यांची बैठक, त्यानंतर पुन्हा पालकमंत्र्यांची बैठक अशा सगळ्या घडामोडीनंतर कांदा लिलाव पुन्हा सुरु झाले आहेत. मात्र या बंद दरम्यान जवळपास ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

कांदा निर्यातशुल्कामुळे व्यापारी आक्रमक

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क लावल्यामुळे कांदा व्यापारी आक्रमक आहेत. सरकारने लावलेले हे निर्यातशुल्क रद्द करावे, अशी प्रमुख मागणी व्यापाऱ्यांची आहे. या मूळ मागणीसह अन्यही व्यापाऱ्यांच्या काही मागण्या आहेत. यामुळे नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने २० सप्टेंबरपासून संप सुरू केला होता.

दरम्यान, १३ दिवसांपासून कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. ही बाब लक्षात घेऊन कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू करावेत यासाठी पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी बैठक घेण्यात आली. मंत्र्यांच्या आश्वासनानंतर अखेर व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला. त्यामुळे आजपासून कांदा लिलाव पुन्हा पूर्ववत झाले आहेत.

English Summary: Onion auction starts in Nashik district onion market update
Published on: 03 October 2023, 12:11 IST