एकेकाळी घनदाट वनसंपदा अस्तित्त्वात असलेल्या पालघर जिल्ह्यतील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा या तालुक्यातील जंगले सध्या बेसुमार वृक्षतोड आणि नागरीकरणामुळे झपाटय़ाने नामशेष होत आहेत. या भागातील वनसंपदा पुन्हा एकदा फुलविण्यासाठी केशवसृष्टी ग्रामविकास संस्थेच्या माधव संस्कार केंद्रातील चिमुकले विद्यार्थी जून महिन्यापर्यंत सुमारे एक लाख ‘सीड बॉल्स’ तयार करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे.
पालघर जिल्ह्यतील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा हे दुर्गम तालुके पावसाळ्यात हिरव्यागार वनश्रीने नटलेले असतात. मात्र दिवाळीनंतर नद्यांचे पाणी आटताच हाच भाग भकास होऊन डोंगर- टेकडय़ा बोडक्या होतात. काही वर्षांपूर्वी पर्यंत या दुर्गम आदिवासी तालुक्यात विपुल वनसंपदा अस्तित्त्वात होती. परंतु सध्या होत असलेली बेसुमार वृक्षतोड आणि नागरीकरणामुळे झपाटय़ाने जंगल नामशेष होत चालले आहे.
दरम्यान या परिसरात मागील १० वर्षांपासून ग्रामविकासाचे काम करणाऱ्या केशवसृष्टी ग्रामविकास संस्थेने वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यांतील ५० गावांत सुरू असलेल्या माधव संस्कार केंद्रातील चिमुकल्यांच्या साहाय्याने पुन्हा एकदा या भागात विपुल प्रमाणात वनश्री फुलविण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने साग, ऐन, हिरडा, बेहडा, चिंच, शिसव, पांगारा, बहावा, बाभूळ, पळस, वड, पिंपळ, खैर या सारख्या जंगली झाडांच्या बिया एकत्र करून त्याचे सुमारे एक लाख ‘सीड्स बॉल्स’ तयार करण्यात येणार आहे.
गावाशेजारील नदी, ओहोळ आणि पाणवठय़ाच्या जागी हे चिमुकले एकत्र येऊन माती आणि शेणखत यांचे गोळे बनवून त्यामध्ये झाडांच्या सुकलेल्या बिया पेरून सीड बॉल्स बनविण्याचे काम करीत आहेत.
हे सर्व सीड्स बॉल्स पाऊस सुरू होताच बोडक्या झालेल्या डोंगर आणि टेकडय़ांवर फेकण्यात येणार आहेत.दरम्यान, मागील वर्षी याच मुलांनी जवळपास ३५ हजार सीड बॉल्स तयार करून टाकलेल्यापैकी ९० टक्के झाडे दोन फुट उंचीपर्यंत वाढली आहेत, अशी माहिती शिक्षण विभागप्रमुख कैलास कुरकुटे यांनी दिली
Published on: 05 March 2021, 01:03 IST