Jalgaon News :
महाराष्ट्रातील जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्ये केळी उत्पादनासाठी प्रसिध्द आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पन्न घेतले जाते. जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमधील केळीच्या गुणवत्तेमुळे येथील केळीला बाजारात प्रचंड मागणी आहे. मात्र या वर्षी जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात केळीच्या बागांवर सी.एम. व्ही व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येत असून बागेत मोठ्या प्रमाणात मर रोग पसरलेला आहे.
उत्तर महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठा केळी उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी केळी उत्पादक शेतकऱ्यांना काहींना काही अडचणींना सामोरे जावं लागत आहे. मागच्या वर्षी केळी पिकावर मोठ्या प्रमाणात सी.एम.व्ही म्हणजेच कुकुंबर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे आर्थिक फटका बसला होता आणि यावर्षी अवकाळी पावसाने केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात सीएमव्ही व्हायरसने डोकं वर काढले आहे. शेकडो एकरवरील केळी पीक उपटून फेकून देण्याची वेळ केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.
या रोगास कारणीभूत घटक कोणते -
सतत ढगाळ वातावरण राहील्यास हवेत वाढलेली आर्द्रता आणि जुन-जुलै महिन्यात वारंवार पडणारा अखंडीत पाऊस हे घटक या रोगास पोषक आहेत. या रोगाची लक्षणे प्राथमिक अवस्थेत ओळखून त्यावर नियंत्रण मिळवले नाही तर हा रोग झपाट्याने वाढतो. या रोगाची लागन केळीच्या रोगट कंदापासून होतो, त्याचबरोबर या रोगाचा प्रसार मावा या किडीमार्फतही होतो.तसेच कमीत कमी दोन ते तीन महिन्यांचा विश्रांती कालावधी नसल्याने तसेच पिके आलटुन पालटुन घेत नसल्याने रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसुन येते.
या रोगाची लक्षणे ही आहेत -
सुरुवातीस कोवळया पानांवर पिवळसर पट्टे दिसुन येतात. हे पिवळसपट्टे पानांवर तुरळक किंवा संपूर्ण पानावर आढळून येतात. कधी कधी एका पानावर अर्धा पट्टे पसरलेले असतात. कालांतराने पान आकसते आणि पानांचा आकार लहान दिसू लागतो. अश्या झाडाची वाढ खुंटते, आणि फण्याचा आकाराची अत्यंत लहान होतो व फळेही योग्य आकाराची येत नाहीत, या रोगामुळे केळीवरही पिवळ्या किंवा काळ्या रंगाच्या रेषा दिसतात आणि अशा केळीचा विक्रीसाठी काहीच उपयोग होत नाही. तापमान व पाऊस पाणी यातील बदलामुळे काहीवेळा हि लक्षणे नाहीशी होऊ शकतात.एकदा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावरील नियंत्रणासाठी त्यावर कोणताही ठोस उपाय करता येत नाही.
या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्यात-
शेतातील लागण झालेला झाडे मुळासकट उपटून काढावीत आणि त्यांना जाळून किंवा गाडून टाकावे. दर ४ ते ५ दिवसांनंतर बागेचे पुन्हा निरीक्षण करुन लागण झालेल्या वरील प्रमाणे विल्हेवाट लावावी,असे न केल्यास बागेतील दुसऱ्या झाडांना बाधित झाडाचा संर्सग होऊन सर्व बागातील झाडे खराब होतील. तसेच बांधावरील सर्व प्रकारची तणे, रानटी झाडांच्या वेली नष्ट करून स्वच्छता ठेवावी. केळीत दुसऱ्या पिकांची लागवड करु नये. सी एम व्ही व्हायरसचा आणि मावा किडीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट 30 ई.सी 20 मिली किंवा थायोमिथोक्झाम 25 डब्लु, जी. 2 ग्रॅम किंव इमिडाक्लोप्रीड 17.8 एस.एल 5 मिली या किटकनाकांची 10 ली. पाण्यामध्ये मिसळून बाग पूर्णपणे स्वच्छ करुन फवारणी करावी.
Published on: 27 September 2023, 03:47 IST