News

राज्यात जून, जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यावेळी पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली पण आता पेरणी केलेल्या भागात पावसाची उघडीप आहे. त्यामुळे पाण्याअभावी पीके सुकण्यास सुरुवात झाली.

Updated on 01 September, 2023 11:14 AM IST

पैठण

मराठवाड्यात अद्यापही चांगला पाऊस झाला नसल्याने शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जर पाऊस झाला नाही तर मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी नोटीस बजावली असून कर्ज भरण्यास सांगितले आहे. तसंच कर्ज न भरल्यास शेतकऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येईल असंही या नोटीस मधून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी आणखीच संकटात सापडले आहेत.

पावसाची विश्रांती, बँकांकडून नोटीस

राज्यात जून, जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यावेळी पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली पण आता पेरणी केलेल्या भागात पावसाची उघडीप आहे. त्यामुळे पाण्याअभावी पीके सुकण्यास सुरुवात झाली. तसंच काही शेतकऱ्यांना पीक वाया जाण्याची भीती देखील सतावत आहे. त्यातच ऑगस्ट महिन्यापासून पावसाने चांगलाच खंड दिला. आणि त्यातच बँकांनी नोटीस बजावली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकट आणखीच गडद झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी बँकांकडून थेट नोटिसा पाठवल्या जात आहे. एवढेच नाही तर कर्ज न भरल्यास खटला दखल करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील बँकांनी दिला आहे.

पैठण तालुक्यातील बालानगर गावातील शेतकरी रामनाथ गोर्डे यांचा उदारनिर्वाह शेतीवर चालतो. पण परिस्थिती आर्थिक बेताची असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून शेतीसाठी २५ हजारांचे कर्ज घेतलं. शेतीतील उत्पन्नातून ते कर्ज भरणार होते. पण मागील तीन वर्षापासून त्यांच्यावर अस्मानी संकट घोंगावत आहे. कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी या मुळे शेती तोट्यात जात आहे. त्यामुळे त्यांना कर्ज भरण्यास विलंब झाला. त्यातच आता गोर्डे यांना बँकेने नोटीस पाठवून शेतीसाठी घेतलेलं कर्ज भरण्याचा तगादा लावला आहे. २५ हजाराचं कर्जाचे व्याजासह ४१ हजार रुपये भरण्याच नोटीसेतून सांगण्यात आलं आहे. तसेच तीस दिवसात हे कर्ज न फेडल्यास कारवाईचा इशाराही त्यांना देण्यात आला आहे.

दरम्यान, पैठण तालुक्यातील गोर्डे या शेतकऱ्याला नोटीस आली नाही तर अनेक शेतकऱ्यांना बँकेने नोटीस बजावली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदार संघातील शेतकऱ्यांना या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं आश्वासन देत आहे. मात्र, दुसरीकडे त्याच शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी बँकांकडून नोटीसा पाठवल्या जात आहे. आता शेतकऱ्यांच्या संकटात सुद्धा त्यांच्या पाठीशी सरकार उभं राहणार का? हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

English Summary: On one hand government announcement for common man on other hand notice to farmers for payment of loan,
Published on: 23 August 2023, 04:06 IST