पुणे: केंद्रीय क्रीडा व युवक कल्याणमंत्री कर्नल राजवर्धनसिंग राठोड म्हणाले, खेळासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे स्वागत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे या दुसऱ्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचे अयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाचे आम्ही मनापासून आभारी आहे. पुढच्या दहा दिवसात येथे होणाऱ्या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण होणार असून या नव्या चॅम्पियनला सर्व देश पाहणार आहे. या स्पर्धेतून 1 हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिवर्षी 5 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. येथील विजेत्या खेळाडूंतून ऑलिंपिक विजेते तयार होतील. खेळाच्या मैदानात मिळणारे शिक्षण कोणत्याही पुस्तकात मिळत नाही. आजची पिढी मजबूत होण्यासाठी युवकांनी खेळण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश केंद्राचे क्रीडा सचिव राहूल भटनागर यांनी वाचून दाखविला. खेलो इंडियाच्या “जय आणि विजय” या दोन्ही शुभंकरांनी मैदानात फेरी मारली. यावेळी खेळाडूंनी देशभराच्या प्रमुख शहरांची यात्रा करून आलेल्या खेलो इंडियाची ज्योत मान्यवरांच्या हाती दिली. यावेळी केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी उपस्थितांना खेळा विषयी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली.
युवकांसाठी खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन करून केंद्र सरकार स्वामी विवेकानंदांच्या सुदृढ भारत निर्माणाचा मंत्र आचरणात आणत आहे. तीच प्रेरणा घेऊन क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उंचावण्यासाठी औरंगाबादमध्ये महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
केंद्राच्या धर्तीवरच राज्य शासनानेही क्रीडा क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पूर्वी तालुका स्तरावर क्रीडा मैदानाच्या उभारणीसाठी 1 कोटी रुपये दिले जात होते, ती रक्कम आता 5 कोटी रूपये केली आहे. तर विभाग स्तरावरील मैदानासाठी 24 कोटी रूपयांच्या ऐवजी 45 कोटी रूपये दिले जात आहेत. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठीच राज्य शासनाने ही पावले उचलली आहेत.
“लोकराज्य” विशेषांकाचे प्रकाशन
महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्यच्या जानेवारी महिन्याच्या खेलो इंडिया विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंग राठोड, क्रीडामंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू, प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on: 10 January 2019, 08:02 IST