News

शेतकऱ्यांना कांद्याला तीन हजारांहून अधिक दर अपेक्षित होता; पण सोलापूर, नाशिकसह सर्वच बाजार समित्यांमध्ये नवीन कांद्याचे दर गडगडले आहेत. दक्षिण भारतात अवकाळी पाऊस सुरू असल्याने कांद्याची मागणी घटली आहे.

Updated on 14 December, 2022 12:13 PM IST

शेतकऱ्यांना कांद्याला तीन हजारांहून अधिक दर अपेक्षित होता; पण सोलापूर, नाशिकसह सर्वच बाजार समित्यांमध्ये नवीन कांद्याचे दर गडगडले आहेत. दक्षिण भारतात अवकाळी पाऊस सुरू असल्याने कांद्याची मागणी घटली आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती व नाशिक जिल्ह्यातील कांदा मोठ्या प्रमाणावर दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगण, केरळ व कर्नाटक या राज्यांमध्ये जातो. पण, सध्या दक्षिण भारतातील काही भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे कांद्याची मागणी घटली असल्याची माहिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा विभागप्रमुख विनोद पाटील यांनी दिली.

सध्या बाजारात नवीन कांदा ३० टक्के तर जुना कांदा ७० टक्के आहे. पुणे, बीड, उस्मानाबाद, सोलापूर येथून नवीन कांदा विक्रीसाठी येत आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे कांदा लागवड लांबली होती आणि त्यात जुना कांदा खराब झाल्याचा अंदाज होता.

त्यामुळे नवीन कांदा डिसेंबरमध्ये बाजारात आल्यावर तीन हजारांहून अधिक दर मिळेल, असा शेतकऱ्यांना विश्वास होता. पण, तीन हजारांपर्यंत असलेला दर आता अडीच हजारांपेक्षाही कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या नवीन कांद्याला सर्वाधिक २३०० रुपयांपर्यंतच (प्रतिक्विंटल) दर मिळत आहे.

English Summary: Old onion fetches bargain price; New onion is getting this price
Published on: 14 December 2022, 12:13 IST