प्रा. दिपाली चांगदेव सातव
द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी करताना द्राक्षाच्या छाटणीनंतर काडीची वाढ कशी झाली आहे. पक्वता कितपत आली आहे हे तपासून पाहणे आवश्यक असते. छाटणी करतेवेळी जमिनीची अवस्था तसेच त्या वेळचे हवामान कसे आहे. याबद्दलची माहिती असणे आवश्यक असते. हवामान ढगाळ असेल, पाऊस पडत असेल तर छाटणीचे काम पुढे ढकलावे लागते, याबाबतची माहिती असणे आवश्यक असते.
द्राक्षाच्या कोणत्या जातीच्या काडीवर किती डोळे राखून छाटणी केल्यास अधिक घड लागतात तसेच पक्की काडी, कच्ची काडी, आखूड काडी, लांब काडी, म्हणजे काय याचीही माहिती असणे आवश्यक असते. कितव्या डोळयापर्यंत सूक्ष्म `घडनिर्मिती झाली याची खात्री करून घेण्यासाठी ऑक्टोबर छाटणीपूर्वी १० ते १५ दिवस काडीवरील डोळे तपासणी आवश्यक आहे. यासाठी सामान्यपणे ६ ते ९ डोळे तपासावेत.
द्राक्षवेलीच्या खोडावरील ठरावीक पद्धतीने गोलाकार साल काढली असता पानात तयार झालेले अन्न मुळाकडे वाहून जाण्याची क्रिया काही काळ बंद करून वेलीवरील घडवाढीसाठीही अधिक अन्नाचा पुरवठा उपलब्ध करून देता येतो. घडाचे वजन तसेच गुणवत्ता यांत वाढ मिळविता येते. जोमदार घडवाढीच्या सुरुवातीला अशी क्रिया केल्यास उत्पादनात चांगली वाढ आणि गुणवत्ता मिळविता येते.
उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्याच्या उद्देशाने गर्डलिंग ऑक्टोबर छाटणीनंतर घडात फळधारणा झाल्यानंतर लगेच करावे॰ फळधारणा होऊन गेल्यानंतर आणि घडांचे शेंडे खुडून झाल्यानंतर गर्डलिंग करावे. बागेतील ७० ते ८० टक्के घडांची अवस्था याप्रमाणे आलेली आहे, हे तपासून गर्डलिंग करावे. ज्या वेलींची छाटणी एका दिवसात झालेली आहे, तेवढ्या वेलींवर गर्डलिंग एकाच दिवसात करण्याचा प्रयत्न करावा.
र्डलिंगमुळे एकूण वजनात्मक आणि गुणात्मक वाढ मिळविता येते आणि द्राक्ष पिकण्याच्या काळात अनावश्यक रसायने आणि संजीवके यांचा वापर टाळता येतो आणि उत्तम दर्जाचे द्राक्ष उत्पादन घेता येते.
प्रक्रिया पद्धत:
(अ) द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी:
(१) द्राक्षाच्या वेलीवरील सर्व काड्यांची शेंड्याकडील सर्व पाने काढून टाका.
(२) ज्या काड्या हिरव्या, अपक्व, रोगट असतील त्या सर्व तळातून छाटून टाका.
(३) टपोरे, फुगीर डोळे असणाऱ्या काड्या 6 ते 9 डोळ्यांपर्यंत राखून छाटा. वेगवेगळ्या अंतरावरील काड्यांची आणि डोळयांची संख्या जातीप्रमाणे राखा.
(४) काड्या छाटल्यानंतर उरलेल्या काडीच्या शेंड्याकडील 3-4 डोळ्यांना काळी बोर्डो पेस्ट लावा किंवा हायड्रोजन सायनामाईड वापरा. हे छाटणीनंतर ताबडतोब वापरावे. यासाठी 10 लीटर पाण्यात 200-300 मिली. हायड्रोजन सायनामाईड मिसळा व फवारणी करा.
(५) वेलीच्या खोडावर, ओलांड्यावर, काड्यांच्या तळावर बोर्डो पेस्ट लावा.
(६) छाटलेला सर्व भाग गोळा करून बागेच्या बाहेर काढून नष्ट करा.
(आ) द्राक्ष खोडावर गर्डलिंग करणे
(१) ज्या द्राक्षवेलींवरील बहुतके घडांमध्ये फलधारणेची क्रिया पूर्ण झालेली आहे, अशा वेलींची निवड करा. गर्डलिंग करतेवेळी जमीन ओलसर असावी. कोरडी जमीन असेल तर साल चांगली निघत नाही. आतल्या भागात इजा होण्याची शक्यता असते.
(२) निवडलेल्या वेलींच्या खोडावर जमिनीपासून वरच्या बाजूस वेलींच्या मध्यभागी मोकळी साल काढून सुमारे वीतभर भाग साफ करा.
(३) चाकूने या ठिकाणी फक्त साल कापली जाईल असा गोलाकार काप घ्या.
(४) घेतलेल्या कापाच्या खालच्या बाजूला २ मिमी. अंतरावर पहिल्या कापास समांतर असा संपूर्ण सालीस गोलाकार काप द्या.
(५) दोन्ही कापांमधील साल मोकळी करून काढून टाका.
(६) गर्डलिंग केलेल्या जखमेवर ब्रशने बोर्डो पेस्ट लावा.
लेखक - प्रा.दिपाली चांगदेव सातव, सहाय्यक प्राध्यापिका, कृषि महाविद्यालय,आष्टी
Published on: 22 September 2023, 04:54 IST