गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजतोडणी केली जात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत, अनेक ठिकाणी अजूनही ही विजतोडणी सुरूच आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. असे असताना आता शेतकऱ्यांसमोर अजून एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. आता शेतकऱ्यांकडील पाणीपट्टीची रक्कम साखर कारखान्यांनी उसाच्या बिलातून वसूल करून पाटबंधारे विभागास देण्याबाबत पत्र दिले आहे. साखर आयुक्त यांनीही सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांना याबाबत कळविले आहे. यामुळे आता शेतकरी आक्रमक झाला आहे.
यामुळे आता याबाबत शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पाटबंधारेचे कर्मचारी शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची वसुली ऊसबिलातून करण्यासंदर्भात दबावाने संमतिपत्र घेत आहेत, असे शेतकरी संघटनेने म्हटले आहे. याबाबत माहिती अशी की, शासनाच्या सहकार व वस्त्रोद्योग विभागाच्या २००३ च्या आदेशात पाटबंधारे विभागाच्या सिंचन योजनेची पाणीपट्टीची वसुली यादी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यांना दिली. त्यावर शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून रक्कम वसुल करून ती पाटबंधारे विभागास जमा करावी, असे नमूद करण्यात आले आहे.
सहसंचालक विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी २०१७ मध्ये सर्व कारखान्यांना शेतकऱ्यांकडे असलेली पाणीपट्टीची रक्कम उसाच्या बिलातून वसूल करून पाटबंधारे विभागास देण्याबाबत पत्र दिले आहे. साखर आयुक्तांनी सर्व कारखान्यांना तसे कळविले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा असे होणार आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. सध्या कोरोना, महागाई, तसेच अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी हतबल झाला असताना तो पुन्हा संकटात सापडला आहे. यामुळे राज्य सरकारवर टीका केली जात आहे.
शासनाने वेगवेगळे आदेश काढून शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग बंद करावा. कारखान्यांनीही पीककर्ज वगळता कोणत्याही कपाती ऊसबिलातून करू नयेत. शेतकऱ्यांनीही बिलातून रक्कम वसूल करण्यासाठी संमतीपत्रावर सही करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत मात्र शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Published on: 18 January 2022, 11:47 IST