सध्या शेतकरी वर्गाच्या समस्या या बऱ्याच प्रमाणात वाढताना दिसत आहेत. नैसर्गिक संकटे तसेच वातावरणीय बदल यामुळे तर शेती करणे फारच जिकिरीचे होऊन बसले आहे. त्यातच महागाईने देखील शेतकऱ्यांना त्रस्त करण्याचे काम केले आहे.
राज्यात वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच शेता साठी लागणारे खते व बियाणे तसेच मशागतीचा खर्च यामध्ये प्रचंड वाढ झाल्याने तसेच बऱ्याच थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा असल्याने आता एक नवीन मार्ग राज्य सरकारने काढला आहे. त्यानुसार आता एक एप्रिल पासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज मिळणार असून याबाबतचा जिल्हा बँकर्स कमिटीच्या प्रस्तावाला राज्यस्तरीय बँकर्स समितीने मान्यता दिली असून आता राज्य बँक नवी मर्यादा जाहीर करणार आहे. सध्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून जर आपण 2001 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा विचार केला तर तब्बल 38 हजार 156 शेतकऱ्यांनी विविध कारणामुळे आत्महत्या केली आहे.
जर या आत्महत्यांमागे प्रमुख कारणांचा विचार केला तर यामध्ये नैसर्गिक संकटांमध्ये बँकांकडून कर्ज वसुलीचा तगादा, बँकेकडून वेळेत कर्ज न मिळण्याची समस्या या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांना खासगी सावकाराच्या आधार घ्यावा लागतो. या सगळ्या समस्या वर उपाय म्हणून आता राज्य सरकारने बँकेच्या पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा निर्णय एक एप्रिलपासून लागू होऊन त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.. नवीन आर्थिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे.
आता शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याने बँकांची थकबाकी देखील वाढणार नाही आणि त्यासोबत पुढे कर्जमाफीची गरज देखील भासणार नाही असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे.
Published on: 06 March 2022, 09:47 IST