खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले होते. या निसर्गाच्या लहरीपणामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. उत्पादनात झालेली घट आणि जागतिक बाजारपेठेत वाढलेली कापसाची मागणी यामुळे कापसाला कधी नव्हे तो विक्रमी दर प्राप्त झाला. परंतु यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यापेक्षा व्यापारी अधिक मालामाल होत असताना बघायला मिळत आहे.
हंगामाच्या सुरुवातीला कापसाच्या उत्पादनात घट झालेली असताना देखील कापसाला अपेक्षित असा दर प्राप्त होत नव्हता. असे असले तरी त्यावेळी पैशांची चणचण भासत असल्याने अनेक छोट्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री करून टाकला. आता हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना कापसाच्या दरात मोठी वाढ झाली आहे सध्या कापसाला दहा हजार रुपये प्रतिक्विंटल हून अधिक दर मिळत आहे. परंतु या वाढत्या दराचा फायदा केवळ बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांना होत आहे, या वाढत्या दराचा सर्वाधिक फायदा कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना होत असल्याचे समजत आहे.
असा कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे, आणि आता काही मोजक्याच बड्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक राहिला आहे त्यामुळे या वाढत्या दराचा फायदा अशा बड्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाचं होतोय. या हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कापसाला व्यवस्थित बोंडे फुटले नव्हती अनेकांचा कापूस केवळ एक ते दोन वेचणीतच संपुष्टात आला होता. मात्र असे असतानाही शेतकऱ्यांनी बोंड आळी चा धोका लक्षात घेता आणि पुढच्या हंगामात कापसाच्या फरदड उत्पादनामुळे होणारा तोटा या बाबी ध्यानात घेता फरदड कापसाच्या उत्पादनास दुरूनच राम-राम केला होता.
मात्र, आता हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाचं कापसाच्या दरात झालेली मोठी वाढ लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी फरदड उत्पादनामुळे होणाऱ्या तोट्याची तमा न बाळगता सर्रासपणे कापसाचे फरदड उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या नांदेड जिल्ह्यात पळट्याना पाणी देण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना फरदड कापसाच्या उत्पादनातून हात खर्चाला पैसे होतील अशी आशा आहे. मात्र यामुळे पुढील हंगामातील पिकांना मोठा फटका बसू शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे. एकंदरीत फरदड उत्पादनामुळे होणारा तोटा व जमिनी नापीक होण्याचा धोका याची तमा न बाळगता शेतकऱ्यांनी फरदड कापसाकडे आपला मोर्चा वळवला आहे. याचा परिणाम काय होतो हा तर येणारा काळच सांगेल मात्र नांदेड जिल्ह्यात वाढत्या दरामुळे कापसाचे फरदड उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे.
Published on: 06 March 2022, 03:27 IST