काही दिवसांपूर्वीच देशाच्या पूर्वेकडील भागात ‘अम्फान’ चक्रीवादळाचा तीव्र परिणाम झाला होता. आता पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावर नवीन चक्रीवादळ 'निसर्ग' निर्माण होऊ लागले आहे. अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असल्याने आज महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत निसर्ग चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. ताशी ११० ते १२५ किलोमीटर चक्राकार वारे वाहत असलेले हे चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, दमणसह कोकण किनारपट्टीला धडकणार असल्याने हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हे चक्रीवादळ गोवाच्या पणजीपासून साधरण ३७० किलोमीटर दक्षिण-पश्चिममध्ये, मुंबईपासून ६९० किलोमीटर दक्षिण - पश्चिम आणि गुजरातच्या सुरतपासून ९२० किलोमीटर दक्षिण- दक्षिण - पश्चिममध्ये स्थित आहे. आयएमडीच्या नुसार, दक्षिण पूर्वी आणि पूर्वी मध्य अरबी समु्द्र आणि लक्षद्वीप क्षेत्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पुढील २४ तासात निसर्ग चक्रीवादळ पूर्वी मध्य आणि आसपासच्या दक्षिण पूर्वी अरबी समुद्रावरील दाब वाढण्याची शक्यता आहे. तीन जून म्हणजे उद्यापर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर हे वादळ पोहचणार आहे. चक्रीवादळ निसर्गामुळे मच्छिमारांना सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. जी मच्छिमार अरबी समुद्रात गेले आहेत त्यांना तात्काळ किनाऱ्यावर परतण्यास सांगण्यात आले आहे. पालघरमधील ७३ बोटी अजून समुद्रात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या वादळाची लाईव्ह ट्रॅकिंग करणे शक्य आहे. आयएमडीच्या संकेतस्थळाच्या माध्यमातूही याला ट्रॅकिंग केले जाऊ शकते.
एनडीआरएफ टीम आहे तयार
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ टीम चिपळूणात दाखल उद्या ३ जून रोजी कोकण किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग या चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफची टीम चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. या टीममध्ये एकूण १८ जवान आहेत. सोबत इन्स्पेक्टर आणि सबइन्स्पेक्टर असून ही सर्व टीम आज दापोली दाभोळ आणि गुहागर या परिसराची पाहणी करणार आहे. वादळानंतर मोठ्या आकाराचे वृक्ष तोडण्यासाठी लागणारी सर्व मशिनरी, इमर्जन्सी बोट, कटर, रोप अशा सर्व सामग्री सहित येथील आज समुद्र किनारपट्टीची पाहणी करणार आहे.
Published on: 02 June 2020, 12:58 IST