कोरोना व्हायरसचे संकट असताना महाराष्ट्रासमोर निसर्गाचे संकट आले आहे. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागला आहे. श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरवात झाली. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकले असून अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान 'निसर्ग' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याशी चर्चा केली आहे. सोबतच दमन आणि दीव, दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्याशी देखील चर्चा केली. या राज्यांच्या प्रमुखांसोबत चर्चा करत पंतप्रधान मोदी यांनी या चक्रीवादळाचा सामना करत असताना केंद्राकडून सर्व प्रकारची मदत आणि सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले.
काल आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या आपत्तीच्या प्रसंगी केंद्रसरकार राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितल्याची माहिती दिली होती. पंतप्रधानांनी फोनद्वारे आपल्याशी संवाद साधला. केंद्राकडून या संकटात हवी ती मदत मिळेल, चिंता करु नका, असे मोदींनी म्हटल्याचं ठाकरे यांनी सांगितले होते. पंतप्रधान कार्यालयाकडून या संदर्भात ट्वीट करत माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, दमन दीव, दादरा आणि नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत चक्रीवादळासंदर्भात चर्चा करत हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
NDRF ची पथकं तैनात
चक्रीवादळ जवळपास सव्वाशे किमीच्या वेगाने धडकेल, त्यासोबत पाऊसही असेल. निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आलं असून अलिबागजवळ धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ मोठं आहे, त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. एनडीआरएफच्या 20 तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. एका तुकडीत 45 जवानांचा समावेश आहे. तसंच नौदल, वायुदल, लष्कर आणि हवामान विभागही सज्ज आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ आले असून ते आज अलिबागला धडकण्याचा अंदाज आहे. इतर चक्रीवादळापेक्षा याचा जोर अधिक राहणार आहे. या वादळामुळे नासधुस होऊ नये, मनुष्य हानी होऊ नये यासाठी नेव्ही, आर्मीसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे, सर्व टीम्स सर्व आयुधांसह सज्ज आहेत. सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क झाला असून सर्वांना सुखरूप समुद्रातून बाहेर काढून घरी आणण्यात आले आहे, असं काल उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.
Published on: 03 June 2020, 03:42 IST