कोरोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करत असतानाच एका नैसर्गिक संकट उभे राहिले आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकणार आहे. इतर चक्रीवादळापेक्षा याचा जोर अधिक राहणार आहे. 'निसर्ग' चक्रीवादळामुळं मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली होती. यानुसार राज्यात मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
ताशी १२ किमी वेगाने निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास सुरू आहे. किनारपट्टीवर धडकताना ११० किमी वेगाने धडकण्याची शक्यता आहे. किनारपट्टी क्षेत्रात वाऱ्याचा वेग वाढला आहे. तासागणिक निसर्ग चक्रीवादळ पुढे सरकत असल्याची माहिती आहे. यावेळी निसर्ग चक्रीवादळ अलिबागपासून १४० किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून १९० किलोमीटर अंतरावर आहे. चक्रीवादळ दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम मुंबईवर काल रात्रीपासून जाणवू लागला होता. मुंबईमध्ये रात्री ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरासह दक्षिण मुंबईत देखील जोरदार पाऊस बरसत होता. मध्य मुंबईत पावसाच्या हलक्या बरसत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारनंतर सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात होण्याचा अंदाज आहे. तेव्हा दाट लोकवस्ती असलेल्या कुर्ला, सायन, चेंबूर सारख्या सखल भागात पाणी साचण्याचा धोका प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. नवी मुंबईत देखील काल सायंकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. पनवेल, कामोठे, खारघरसह जवळपास संपूर्ण नवी मुंबईत पावसाची रिपरिप सुरुच आहे.
वसई विरार क्षेत्रात काल सायंकाळपासून सुरु असणारा पाऊस सकाळी देखील सुरु होता. वसई विरार क्षेत्रातील सर्व रस्ते ओलेचिंब झाले आहेत. उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना वातावरणातील गारव्याचा अनुभव मिळत आहे. मात्र आज आणि उद्या निसर्ग चक्रवादळाचा संकट वसई विरार पश्चिम किनारपट्टी घोंघावत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सकाळच्या वेळेत तरी आणखी चक्रीवादळाचे कोणतेही पडसाद वसई, विरार अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर दिसून आले नाहीत. मच्छीमार बांधवांकडून बोटीतील सर्व सामान काढून सुरक्षित स्थळी हलवणे सुरू आहे.
Published on: 03 June 2020, 11:28 IST