अरबी समुद्रात आलेले निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळ धडकल्यानंकतर उत्तर महाराष्ट्राकडे सरकले. आज सकाळी वादळाची तीव्रता कमी झाली. खानदेशासह पश्चिम विदर्भ आणि परिसरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होते. पुढीव सहा तासांमध्ये ही प्रणाली आखणी निवळणार असून मध्यप्रदेशात सरकून जाणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान वादळामुळे राज्यातील अनेक भागात पाऊस पडला आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस झाला. येथील काही तालुक्यात वादळासह जोरदार पावसाने हजेरी लावली. शिरपूर तालुक्यात सरासरी 47 मिलिमीटर पाऊस झालेला आहे. यात सर्वाधिक पाऊस बोराडी मंडळात 69 मिलिमीटर झालेला आहे, तर सर्वात कमी पाऊस सांगवी मंडळात 16 मिलिमीटर झाला आहे. नाशिक जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. लासगावमध्येही पाऊस झाल्याने तेथील कांदा व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अलिबाग जवळ किनारपट्टीला धडकले. त्यावेळी वादळाचा ताशी ११० ते १२० किलोमीटर चक्रकार वारे वाहत होते, आणि पाऊसही झाला आहे. वादळाच्या प्रभावामुळे उंच लाटा उसळल्याने समुद्राने रौद्र रुप धारण केले. किनारपट्टीवर विध्वंस केल्यानंतर या वादळाने जोरदार वारे पावसासह ईशान्य दिशेकडे प्रवास सुरू केला. दरम्यान वादळाच्या प्रवाहात येणारी फळबाग, भाजीपालासह शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
पुणे जिल्ह्यातही निसर्ग चक्रीवादळामुळे पावसाने हजेरी लावली. नगर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस झाला. सकाळी आठ वाजेपर्यंत सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावली. जोरदार पाऊस झाल्याने गावातील तलाव आणि बंधाऱ्यांमध्ये पाणी साठले आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. पण पावसापेक्षा अधिक वादळ वारे वाहिले.
Published on: 04 June 2020, 12:34 IST