News

द्राक्ष पंढरी म्हणून विख्यात असलेल्या नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे एका द्राक्ष बागायतदारांचे दोन एकरांवरील द्राक्ष मातीमोल झाल्याची घटना समोर आली आहे, यामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Updated on 10 February, 2022 9:51 PM IST

द्राक्ष पंढरी म्हणून विख्यात असलेल्या नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे एका द्राक्ष बागायतदारांचे दोन एकरांवरील द्राक्ष मातीमोल झाल्याची घटना समोर आली आहे, यामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वादळ एवढे भयावह होते की यामुळे द्राक्षाच्या झाडांसमवेतच द्राक्षाला आधारासाठी उभे केलेले इंगल व तार देखील तुटून पडले आहेत. तालुक्यातील मौजे धारणगाव खडक येथील रहिवासी शेतकरी व द्राक्ष बागायतदार अनिता रमेश वाळुंज या प्रगतीशील महिला शेतकऱ्यांच्या दोन एकरावरील द्राक्ष बागेला वादळी वाऱ्याचे ग्रहण लागले, वादळी वारे एवढे जोराने वाहत होते की, दोन एकरांवरील द्राक्ष तसेच त्यांच्या आधारासाठी लावलेले लोखंडी खांब व तार उपटून जमीनदोस्त झाले आहेत. सदरची घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली असल्याचे सांगितले जात आहे. अनिताजी यांच्या एक-एक एकरावरील दोन द्राक्षबागा आगामी 15 दिवसात काढणीसाठी तयार होणाऱ्या होत्या मात्र ऐन काढणीच्या वेळी काळ बनून आलेल्या वादळाने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यामुळे अनिताजी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अनिताजी यांनी मोठ्या कष्टाने आपल्या दोन एकरावरील द्राक्ष बाग जोपासली होती. द्राक्ष बागेसाठी महागड्या औषधांची फवारणी करत प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि आगामी 15 दिवसात द्राक्ष बागेतून दर्जेदार उत्पादन प्राप्त होईल अशी त्यांची आशा होती. मात्र, लाखो रुपयांचा खर्च करून अहोरात्र कष्ट करून उभारलेली द्राक्षाची बाग ऐन काढणीच्या वेळी जमीनदोस्त झाल्याने या महिला शेतकऱ्याचे मनोबल पूर्ण खचून गेले आहे. अनिताजी यांनी हंगामभर कष्टाची पराकाष्टा केली आणि तेव्हा कुठे द्राक्ष बाग दर्जेदार उत्पादन देण्यासाठी सज्ज झाली होती. मात्र एवढे कष्ट करूनही निसर्गाच्या अवकृपेमुळे अवघ्या 15 दिवसात लाखों रुपयांचे उत्पन्न पदरी पडणारे हिसकावले गेले आहे.

द्राक्ष बागा जोपासण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च ठरलेलाच असतो आणि एवढा मोठा खर्च करून द्राक्षाचे उत्पादन पदरी पडेलच हे मात्र ठरलेलं नसते. निफाड तालुक्यात अनिताजी यांच्या द्राक्ष बागेत झालेली हानी हे दाखवून देण्यास पुरेशी आहे. एकंदरीत उत्पादन वाढीच्या अनुषंगाने शेतकरी राजा अहोरात्र प्रयत्न करत असतो मात्र कधी सुलतानी दडपशाही तर कधी अस्मानी संकटामुळे त्याच्या पदरी अपयशच पडते, तरीदेखील या परिस्थितीवर मात करीत आजही बळीराजा राजासारखे जीवन जगत आहे. 

English Summary: nifad talukas grape grower is in trouble
Published on: 10 February 2022, 09:51 IST