पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडत असते. अनेकांना पीक कर्ज देण्यास बँक तयार राहत नाहीत. तर काही बँकांचे व्याजदर असल्याने शेतकरी कर्ज घेण्यास उत्सुक नसतात. यासर्व बाब लक्षात घेत लातूर जिल्हा बँकेने जिल्ह्यातील बळीराजाला खूश केलं आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सध्या शेतकरी संकटात असताना बँकेच्यावतीने घेण्यात आलेला हा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे.
या संदर्भात लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी बँकेचे अभिनंदन केले आहे. या संदर्भात आमदार धीरज देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी बांधवांना पीक कर्जासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, व्हाईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ आणि संचालक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन! या निर्णयाचा अनेक शेतकरी बांधवाना मोठा लाभ होणार आहे.’ गेल्या काही दिवसात लातूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिक निघून गेले आहे. तसेच लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. जिल्हा बँकेच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना लाभ हाईल, अशी अपेक्षा आहे.
Published on: 24 September 2021, 01:41 IST