News

गोवर्धन गोशाळा कोकण हा प्रकल्प कै. तातू सीताराम राणे ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात आला असून, गावाच्या विकासासाठी गोमातेचे गोमातेचे महत्त्व फार मोठे आहे. गावाच्या विकासासाठी गोमातेचे योगदान केंद्रस्थानी ठेवण्याचा संकल्प या प्रकल्पामागे आहे.

Updated on 12 May, 2025 11:31 AM IST

सिंधुदुर्गनगरी : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करंजेसाटमवाडी (ता. कणकवली) येथे ७० एकर जागेत उभारण्यात आलेल्या गोवर्धन गोशाळा कोकण प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, माजी मंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा नीलम राणे, रवींद्र पाठक, प्रमोद जठार आदी मान्यवर उपस्थित होते.

गोवर्धन गोशाळा कोकण हा प्रकल्प कै. तातू सीताराम राणे ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात आला असून, गावाच्या विकासासाठी गोमातेचे गोमातेचे महत्त्व फार मोठे आहे. गावाच्या विकासासाठी गोमातेचे योगदान केंद्रस्थानी ठेवण्याचा संकल्प या प्रकल्पामागे आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशातील एकूण गोशाळांपैकी उत्तम गोशाळा कोकणात तयार झाली आहे. या माध्यमातून एक अर्थव्यवस्था तयार होऊ शकते. शेतकऱ्यांना या गोशाळेच्या माध्यमातून व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देता येईल, अशी व्यवस्था येथे आहे. विविध प्रकारची उत्पादन केंद्रे आणि कृषी पशुसंवर्धनाचे पर्यटन केंद्र म्हणून देखील येथे व्यवस्था करण्यात आली आहे. गोमातेचे महत्त्व आपल्या संस्कृतीत फार मोठे आहे. गोशाळा म्हणजे केवळ गायींचे संरक्षण नव्हे, तर ती एक सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणपूरक क्रांती आहे. गावाच्या विकासासाठी अशा प्रकल्पांची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गसंपन्न असून, अशा प्रकल्पांमुळे स्थानिकांना रोजगार, शाश्वत शेती आणि नैसर्गिक जीवनशैलीची दिशा मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हा उपक्रम गोमाता संवर्धनासाठीचा मॉडेल प्रकल्प असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प दिशादर्शक तसेच मार्गदर्शक ठरेल. निसर्गाची मुक्त उधळण आणि संस्कृतीचा मुक्त ठेवा असलेल्या कोकणात गोमाता संवर्धनासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. शेतकऱ्यांची समृद्धी साधणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. कोकणात धवल क्रांतीचा पाया घातला जात असून, परिसरातील दूधही येथे संकलित केले जाणार आहे. त्यामुळे दूध व्यवसायालाही चालना मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

English Summary: Natural farming will not gain momentum without cow conservation Chief Minister Devendra Fadnavis
Published on: 12 May 2025, 11:31 IST