नवी दिल्ली: उष्णतेच्या लाटेमुळे निर्माण होणारा धोका कमी करण्यासंदर्भात, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, येत्या 27-28 तारखेला दोन दिवसांची राष्ट्रीय कार्यशाळा घेणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने, नागपूर इथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
उष्णतेच्या लाटेसंदर्भातल्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना वेळेवर जारी करणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी, उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसणाऱ्या 13 राज्यांत उष्णता लाटेसंदर्भात कृती आराखडा तयार करणे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नियमित देखरेख आणि माहिती, प्रसारमाध्यमांद्वारे व्यापक जनजागृती मोहिम यामुळे उष्णतेच्या लाटेशी संबंधित बळींची संख्या गेल्या काही वर्षात लक्षणीय कमी झाली आहे. 2015 मध्ये या बळींची संख्या 2000 पेक्षा जास्त होती, तर 2018 मधे ही संख्या 25 पर्यंत कमी झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात कृती आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी करण्याच्या गरजेबाबत जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेचे दुष्परिणाम कमी करण्यासंदर्भात भरीव कार्य करणारी राज्ये आपले अनुभव कथन करतील यामुळे इतरांनाही त्याचा लाभ होणार आहे. हवामान बदल आणि विकास आराखडा आणि उष्णतेच्या लाटेमुळे होणारा धोका कमी करण्याच्या उपाययोजना एकीकृत करण्यावरही यावेळी चर्चा होणार आहे.
Published on: 27 February 2019, 08:24 IST