नाशिक
केंद्र सरकारने पीक विमा योजनेला मुदतवाढ दिल्याने वंचित राहिलेले शेतकरी पीक विमा भरत आहेत. १ रुपया पीक विमा योजनेचा नाशिक जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे पीक विमा अर्जात नाशिक जिल्हा अग्रेसर ठरला आहे.
जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार ४५७ शेतकरी सहभागी झाले आहेत. तसंच योजनेला मुदतवाढ मिळाल्यामुळे आणखी अर्जदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पीक विमा भरण्यासाठी आधी ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत होती. पण अनेक ठिकाणी पावसामुळे लाईट, इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे अर्ज करताना सर्व्हरमध्येही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले होते. याबाबतचा विचार करुन राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी होती. त्यावर केंद्राने सकारात्मक निर्णय घेत ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
आज १ ऑगस्टपर्यंत नाशिक जिल्ह्यातील चार लाख ६७ हजार ४५७ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. त्यांच्यासाठी विमा कंपनीला साधारणतः १०५५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान, पीक विमा अर्ज करण्याची तारीख आणखी तीन दिवस असल्याने या तीन दिवसांत साधारणत: एक लाख शेतकरी अर्ज करु शकतात, असा अंदाज कृषी विभागाने दिला आहे.
Published on: 01 August 2023, 06:11 IST