राज्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड केली जाते, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील द्राक्ष लागवड अवकाळी पाऊस व गारपीटला भेट चढत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या डिसेंबरमध्ये राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता, याचा परिणाम म्हणून राज्यातील द्राक्ष बागा पूर्ण क्षतीग्रस्त झाल्या होत्या. द्राक्ष बागा फळधारणा अवस्थेत असतानाच अवेळी आलेल्या पावसामुळे कोट्यावधी रुपयांचे द्राक्ष बागायतदारांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याचं चित्र बघायला मिळाले होते. फक्त मागच्या डिसेंबर मध्ये अशी परिस्थिती होती असे नाही गेल्या अनेक वर्षांपासून द्राक्ष बागायतदार शेतकरी अशा संकटांचा सामना करत आहेत यामुळे द्राक्ष बागायतदार पुरता बेजार झाल्याचे बघायला मिळत आहे.
मागच्या डिसेंबर मध्ये सांगली जिल्ह्यातही अशीच परिस्थिती होती यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागा मातीमोल झाल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळाले होते. मात्र असे असेल तरी, डिसेंबर मध्ये झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा मस्कत जातीच्या द्राक्ष बागांवर कुठलाच प्रभाव झाला नसल्याचा दावा तासगाव तालुक्याच्या मौजे येथील एका द्राक्ष बागायतदारांने केला आहे. मौजे मनेराजुरी येथील द्राक्ष बागायतदार पोपट कोरे यांच्या मते विपरीत परिस्थितीवर देखील मस्कत जातीची त्यांची अर्धा एकरावरील द्राक्ष बाग मात करत यशस्वी उत्पादन प्राप्त करते. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी लाखो रुपयांचे नुकसान सहन करत आहेत तर कोरे यांना या मस्कत जातीच्या द्राक्षांपासून दुपटीने उत्पादन प्राप्त होत आहे. कोरे यांनी पाच एकर क्षेत्रावर द्राक्ष लागवड केली आहे त्यांच्या या एवढ्या मोठ्या क्षेत्रावरील द्राक्ष बागा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पूर्णतः मातीमोल झाल्या परिणामी त्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. मात्र त्यांच्याच दुसऱ्या शेतात लावलेली अर्धा एकरावरील मस्कत जातीची द्राक्ष बाग अवकाळी पाऊस व गारपीट सहन करून त्यांना चांगले मोठे उत्पादन प्राप्त करून देत आहे.
कोरे आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनीत गेल्या अनेक वर्षांपासून द्राक्ष शेती करीत आहेत. त्यांनी आपल्या पाच एकर जमिनीवर सुपर सोनाक, एस एस एन, आर के आणि अनुष्का सिडलेस सारख्या इतर अनेक सुधारित जातीच्या द्राक्षांची लागवड केली आहे. सुरुवातीला या जातीच्या द्राक्षांपासून त्यांना चांगला नफा मिळत होता मात्र गेल्या तीन वर्षांपासून वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे गारपिटीमुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. तर दुसरीकडे फक्त अर्ध्या एकर क्षेत्रावर लावलेल्या मस्तक जातीच्या द्राक्षांपासून त्यांना बक्कळ नफा मिळत आहे. त्यांनी लावलेल्या दुसऱ्या जातीच्या द्राक्षांचे वर्षातून एकदाच हंगाम घेता येतो. मात्र मस्तक जातीचे द्राक्षापासून एका वर्षातून दोनदा उत्पादन प्राप्त केले जाते. त्यांना त्यांच्या पाच एकर द्राक्ष क्षेत्रात सुमारे 60 ते 70 टक्के नुकसान सहन करावे लागत आहे तीस टक्के उत्पादन प्राप्त होते मात्र त्यातून फक्त उत्पादन खर्च निघत असल्याचे त्यांनी नमूद केले. सुरुवातीला द्राक्ष बागांमधून त्यांना पाच ते सात लाख रुपये मिळत होते मात्र गेल्या तीन वर्षांपासून त्यांची पाच एकरांवरील द्राक्ष बाग निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडले असून यापासून उत्पादन मिळण्याऐवजी त्यांचे 21 लाखांचे नुकसान झाले आहे.
कोरे यांच्या मते, इतर जातींपेक्षा मस्कत ही यूरोपियन द्राक्षाची जात द्राक्ष बागायतदारांना विशेष लाभप्रद सिद्ध होऊ शकते. त्यांनादेखील मस्कत जातीच्या द्राक्षांतून चांगले उत्पन्न पदरी पडले असल्याचे सांगितले आहे. कोरे यांचे तामिळनाडूत एक द्राक्ष उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांनी 2020 मध्ये त्यांच्याकडून मस्कत जातीच्या द्राक्षाच्या कांड्या आणल्या. त्या कांड्या विकसित करण्यासाठी कर्नाटक मध्ये पाठवल्या गेल्या. तामिळनाडूमध्ये जास्त पर्जन्यमान असते मात्र अशा हवामानात देखील या जातीची द्राक्षे चांगली जोपासली जातात आणि त्यापासून दर्जेदार उत्पादन देखील मिळते म्हणून कोरे यांनी हा प्रयोग आपल्याकडे यशस्वी होईल या अशावादाने केला आणि कोरे यांचा हा प्रयोग आता यशस्वी देखील होताना दिसत आहे. मस्कत जातीची द्राक्षमध्ये बिया आढळतात तसेच त्यांची चव जांभूळ रेड बेरी आणि करवंद सारखी असल्याचे सांगितले जाते. त्यांना या जातीच्या द्राक्षमधून दुसर्या आणि तिसर्या हार्वेस्टिंग मध्ये तीन-तीन टन म्हणजे एकूण सहा टन उत्पादन प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे हे उत्पादन अवकाळी पाऊस व गारपीट झाली असता मिळाल्याचे सांगितले जात आहे. अवकाळी पाऊस व गारपीट मध्ये या जातीच्या द्राक्षबागांवर फक्त पाच टक्के विपरीत परिणाम झाल्याचा अंदाज कोरे यांनी सांगितला. तसेच कोरे यांनी सांगितले की अर्ध्या एकरावरील मस्कत जातीच्या द्राक्षबागावर ते कुठल्याही रासायनिक औषध फवारणी नाही त्यामुळे हे द्राक्ष पूर्णतः सेंद्रीय असून विषमुक्त आहेत. कोरे यांचा हा प्रयोग सांगली जिल्ह्यातील इतर द्राक्ष बागायतदारांसमवेतच राज्यातील इतर द्राक्ष बागायतदारांना मार्गदर्शक ठरू शकतो असे मत तालुक्यातील द्राक्ष बागायतदार व्यक्त करत आहेत.
Published on: 03 February 2022, 09:36 IST