मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आज सकाळ पासून माथाडी कामगारांनी ठिया आंदोलन सुरु केले होते. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत माथाडी कामगार प्रचंड संतप्त झाल्याचे दिसून आले. जवळपास ७०० ते ८०० कामगारांनी बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाचा ताबा घेतला होता. संबंधित मागण्याची जोरदार घोषणाबाजी करत कामगारांनी कार्यालय दणाणून सोडले.
हरिनामाचे भजन आणि अभंग गात संपूर्ण कामगार आंदोलनाशी एकरूप झाले होते. मात्र, व्यापाऱ्यांच्या सहकार्याची भूमिका स्पष्ट होताच ८ तास सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. गेली दोन वर्षांपासून ५० किलो पेक्षा अधिक वजनाची गोणी व्यापाऱ्यांनी मागवू नये याबाबत आंदोलन सुरु करण्यात आले. दरम्यान कोरोना महामारीमुळे हे आंदोलन थंड झाले होते.
मात्र, पुन्हा मार्केट सुरळीत सुरु झाल्याने हे आंदोलन छेडण्यात आले. त्यामुळे आज सकाळी ८ वाजल्यापासून माथाडी कामगारांनी न्याय मिळेपर्यंत कार्यालय न सोडण्याचा निश्चय केला. माथाडी कामगारांनी संपूर्ण तीन मजली प्रशासकीय इमारतीचा कोपरा न कोपरा ताब्यात घेत अखंड हरिनाम करत जोरदार घोषणाबाजी सुरु होती. बाजार समिती सभापती, सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर हे आंदोलन सुरु असल्याने त्याचा परिणाम प्रशासकीय कार्यालयाच्या कामकाजावर पाहायला मिळाला. तर आंदोलन दरम्यान मोठा पोलीस फौजफाटा येथे उपस्थित झाला होता.
राज्य पणन विभाग आणि मुंबई APMC प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे प्रकरण चिघळल्याचे दिसत आहे. तर या भूमिकेमुळे व्यापारी, माथाडी आणि शेतकऱ्यांचे नुकसानीचे बाजरी समितीला घेणे देणे नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता या आंदोलनानंतर पणन विभाग आणि मुंबई बाजर समिती काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
वारंवार सूचना करून सुद्धा कांदा बटाटा मार्केटमध्ये व्यापारी ५० किलो पेक्षा अधिक वजनाच्या गोणी मागवत असल्याने हे आंदोलन केले गेले. ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणी नसाव्यात याबाबत केंद्र शासनाचा नियम आहे. शिवाय राज्याचे सहकार आणि पणन मंत्र्यांनी याबाबत लेखी आदेश देखील दिले आहेत. तरीसुद्धा जाणीवपूर्वक व्यापारी ५० किलो पेक्षा अधिक वजनाचा शेतमाल मागवत असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय याबाबत कामगारांनी रास्त मागणी आणि आंदोलन केले आहे.
तर माथाडी कामगारांचा त्रास लक्षात घेण्याऐवजी कामगारांनाच वेठीस धरण्यास व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद आंदोलन केल्याने कामगार अधिकच संतापले आहेत. शिवाय या बंद बाबत व्यापाऱ्यांनी माथाडी कामगारांना कोणतीही सूचना अथवा लेखी पात्र दिले नाही. मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये आज जवळपास ३०० गाड्यांची आवक झाली असून हा शेतमाल गाड्यांमध्ये असाच पडून आहे. तर बाजारात विक्रीसाठी आधी असलेला शेतमाल ग्राहकाविना बाजार आवारात पडून राहिला आहे. त्यामुळे या वादाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे दिसत आहे.
कामगार आणि व्यापाऱ्यांच्या वादात शेतकरी भरडला जात असून कांदा बटाटा नाशिवंत माल असल्याने आंदोलनाचा मोठा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसणार आहे. तर या चिघळलेल्या वादाने शेतकरी, व्यापारी आणि कामगार याना मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कांदा-बटाटा व्यापारी सरकार, शेतकरी आणि कामगारांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आम्हा माथाडी कामगारांना आज निर्णय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नसल्याचा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला होता. तर व्यापाऱ्यांच्या भूमिका जाहीर होताच आंदोलन मागे घेतल्याचे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.
Published on: 21 February 2022, 05:39 IST