मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमधील माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्यातील ५० किलो वजनाचा वाद काल पुन्हा उद्भवला आहे. त्यामुळे काल कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलो वजनाचा अधिक आलेला माल उतरवण्यात आला नाही. परिणामी अधिक वजनाच्या गोणी असलेली वाहने मार्केट परिसरात पडून राहिली आहेत.
मात्र, कालच्या वादाचा मोठा फटका आजच्या बाजारात येणाऱ्या आवकवर झाल्याचे पाहायला मिळाला. तर प्रतिदिन जवळपास २०० गाडी येणार माल १०० गाडीवर आला आहे. शिवाय मार्केट बाहेर उभ्या राहिलेल्या गाड्यांमधून बाहेरच्या बाहेर गोणी खाली करून इतर ठिकाणी विक्रीसाठी नेल्या जात आहेत. त्यामुळे माथाडी कामगार आणि व्यापारी या दोन्ही घटकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे हा वाद दोन्ही घटकांना संकटाच्या खाईत घेऊन चालल्याचे दिसत आहेत. तर "तुला नाही, मला आणि घाल कुत्र्याला" या म्हणी प्रमाणे मार्केट बाहेरील कामगार आणि व्यापारी याचा फायदा उचलत असल्याचे दिसत आहे. मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमध्ये आज १०१ गाडी आवक झाली असून २५ ते ३० रुपये दराने कांदा विक्री होत आहे.
मात्र आज देखील ५० किलो वजनाचा शेतमाल खाली न झाल्याने जवळपास ७० ते ८० शेतमाल वाहने मार्केटमध्ये प्रवेश न दिल्याने रस्त्यावर उभी आहेत. त्यामुळे मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तर बाहेरचे मजूर मात्र या गोणी खाली करत असल्याचे सांगण्यात आल्याने बाहेरच्या मजुरांना या वादाचा फायदा होताना दिसत आहे.
उद्या निम्याने आवक कमी झाल्यास अनेक माथाडी कामगार बेरोजगार होतील. याला जबाबदार कोण? असा सवाल बाजार घटक करत आहेत. तर या विषयात बाजार समिती सभापती आणि मार्केट सचिव काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: 17 February 2022, 12:08 IST