नवी दिल्ली: केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय नवे कृषी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आखण्यावर काम करत असून, लवकरच हे धोरण आणले जाईल, ज्यात ग्रामीण, आदिवासी, कृषी आणि वनक्षेत्रात स्वयंउद्योजकता आणि स्थानिक कच्च्या मालापासून उत्पादने बनवण्यावर भर दिला असेल, अशी माहिती MSME आणि रस्ते वाहतूक तसेच महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम (SME) उद्योग चेंबर ऑफ इंडिया, SME निर्यात प्रोत्साहन परिषद तसेच आरोग्य आणि सौंदर्यप्रसाधने क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत त्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. या उद्योगांवर कोविड-19 च्या झालेल्या प्रभावावर देखील यावेळी चर्चा करण्यात आली.
कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही सर्व उद्योगांची जबाबदारी आहे असे, गडकरी यावेळी म्हणाले. सर्वांनी स्वसंरक्षक प्रावरणे जसे की मास्क, सॅनीटायझर यांचा वापर करावा आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, अशी सूचना त्यांनी दिली. देशी उत्पादनांची निर्यात वाढवणे आणि भारतात परदेशी उत्पादनांच्या जागी देशी उत्पादनांना प्रोत्साहन देत बाजारपेठ मिळवून देण्यावर भर देणे ही काळाची गरज आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
त्यासाठी MSME उद्योगांनी अभिनव संशोधन, उद्यमशीलता, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन कौशल्ये आणि ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. जपानी कंपन्यांनी चीनमध्ये केलेली गुंतवणूक काढून इतरत्र वळवावी यासाठी जपान सरकारने आपल्या उद्योजकांना विशेष पैकेज देऊ केले आहे, याची त्यांनी आठवण केली. भारताच्या दृष्टीने ही एक संधी असून आपण लगेच तिचा उपयोग करुन घ्यायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला. दिल्ली-मुंबई हरित द्रुतगती महामार्गाच्या नव्या संरेखनाचे काम सुरु झाले असून, यामुळे औद्योगिक पट्ट्यात तसेच लॉजिस्टिक पार्कमध्ये भविष्यातील गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होणार आहे, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
आरोग्य आणि सौंदर्यप्रसाधन उत्पादक कंपन्यांनी परदेशी उत्पादकांना पर्याय म्हणून देशी आयुर्वेदिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. MSME मंत्रालयाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आयुष क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, MSME ने आयुष मंत्रालयासोबत करार केला आहे, असे त्यांनी सांगितले. आरोग्य आणि सौंदर्यप्रसाधन उत्पादक कंपन्यांनी MSME अंतर्गत नोंदणी करावी, जेणेकरुन त्यांनाही MSME च्या विविध योजनांचा लाभ घेता येईल, असे गडकरी म्हणाले.
यावेळी विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी कोविडमुळे निर्माण झालेली आव्हाने आणि समस्यांची माहिती गडकरी यांना दिली तसेच, ह्या सर्व क्षेत्रांना उर्जितावस्था देण्यासाठी काही उपाययोजना देखील सुचवल्या. यात, कर्जाला दिलेल्या स्थगितीचा विस्तार, लॉकडाऊन च्या काळात कर्मचाऱ्यांना त्यांच्या ESI आणि प्रोविडंट फंडातून वेतन देणे, MSME साठी हेल्पलाईन इत्यादी सूचनांचा समावेश होता. यावेळी प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना गडकरी यांनी उत्तरे दिली आणि सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन देखील दिले.
Published on: 05 May 2020, 07:29 IST