राज्यात सर्वत्र केळीच्या बागा बघायला मिळतात, याची सर्वात जास्त लागवड खानदेशात बघायला मिळते, त्यापाठोपाठ राज्यातील पश्चिम भागात देखील मोठ्या प्रमाणात केळीची लागवड बघायला मिळते. सोलापूर जिल्ह्यातही केळीच्या बागा मनमोहक दृश्य तयार करतात. मात्र जिल्ह्यातील मनमोहक केळीच्या बागा आता एका वेगळ्याच विपरीत परिस्थितीत सापडलेल्या आहेत यामुळे जिल्ह्यातील केळीच्या बागा क्षतीग्रस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या जिल्ह्यात नव्हे-नव्हे तर संपूर्ण राज्यात रब्बी हंगामातील पिकांसाठी तसेच फळबागांसाठी विशेष अनुकूल आणि पोषक वातावरण तयार झाले आहे. याशिवाय खरीपात झालेल्या मनसोक्त पावसामुळे संपूर्ण राज्यात मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे, याचा फायदा केळीच्या बागांसाठी देखील होत आहे, याव्यतिरिक्त बाजारात केळीला चांगला विक्रमी बाजार भाव प्राप्त होत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची चांदी होण्याचा देखील अंदाज वर्तवला जात आहे. मात्र असे असले तरी, महावितरणच्या निर्दयी व्यवहारामुळे केळीच्या बागा क्षतिग्रस्त होत असताना बघायला मिळत आहेत.
मध्यंतरी वातावरणातील प्रतिकूल बदलामुळे केळी पिकावर अनेक रोगांचे सावट बघायला मिळाले होते. केळी पिकावर प्रामुख्याने करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव बघायला मिळाला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी अफाट खर्च करीत, अहोरात्र काबाडकष्ट केले आणि आपल्या योग्य नियोजनाने केळीच्या बागा यथा योग्य परिस्थितीत आणून ठेवल्या. मात्र आता महावितरणच्या दडपशाही मुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत असलेले उजनी धरणजवळील परिसरातील केळीच्या बागा पाणी असूनदेखील जमीनदोस्त होत आहेत. या परिसरात महावितरणने शेतकऱ्यांचा शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे केळीच्या बागा क्षतीग्रस्त झाल्या आहेत. शेतीपंपाच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत या शिवारातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना कधी अस्मानी तर कधी सुलतानी दडपशाहीचा सामना करावा लागत आहे, जाणकार लोकांच्या मते, महावितरणच्या या निर्दयी कारवाईमुळे केळीच्या उत्पादनावर सरळ परिणाम बघायला मिळू शकतो. उजनी धरण जवळील केळीच्या बागा आगामी काही दिवसात काढणीसाठी तयार होतील. या शिवारातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी लाखोंचा खर्च करीत मध्यंतरी झालेल्या वातावरण बदलातून आपल्या केळीच्या बागा शर्तीने जोपासल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात शीतलहर बघायला मिळाली होती, या काळात केळीच्या दरात मोठी घसरण झाली होती.
आता राज्यात सर्वत्र केळी पिकासाठी पोषक वातावरण तयार झाले असून केळीच्या दरात देखील तापमान वाढले असल्याने वाढ झाली आहे. मात्र, आगीतून बचावले आणि धुळीत सापडले याप्रमाणे महावितरणच्या वीज पुरवठा खंडित करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. महावितरणने अशीच निर्दय व कठोर कारवाई केली तर केळी उत्पादक शेतकर्यांचा लाखोंचा खर्च वाया जाईल शिवाय हातातोंडाशी आलेला घास हिसकवण्यात महावितरणची मोठी भूमिका असेल, असे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणात थंडी वाढलेली होती यामुळे केळीच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली. केळी पिकासाठी झालेला लाखोंचा खर्च आणि मध्यंतरी वातावरण बदलामुळे आलेला करपा रोग यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आणि काही केळी उत्पादक शेतकऱ्यांनी अक्षरशः आपल्या केळीच्या बागा मोडीत काढण्याचा निर्णय घेतला. मात्र आता केळी पिकासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे, तसेच उन्हात वाढ झाली असल्याने केळीच्या दरात सुधारणा झाली आहे. परंतु केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कल्याण महावितरणला सहन होत नाही की काय म्हणुन महावितरण सध्या कठोर भूमिकेत असून शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित करत आहे.
सध्या राज्यात सर्वत्र 900 रुपयापासून ते अकराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत केळीला बाजारभाव मिळत आहे, मिळत असलेला बाजार भाव समाधानकारक असला आणि केळी पिकासाठी पोषक वातावरण असले तरी महावितरणच्या या निर्णयामुळे पाण्याअभावी केळीच्या बागा लवकरच जमीनदोस्त होतील असे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. सध्या संपूर्ण राज्यात महावितरणकडून वसुली केली जात आहे, थकीत बिलाची वसुली महावितरणकडून प्रगतिपथावर आहे. राज्यात सर्वात जास्त शेतीपंपावरच थकबाकी असल्याने महावितरण हा निर्णय घेत असल्याचे सांगितले जात आहे. महावितरणने थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना वारंवार नोटिसा बजावल्या आहेत मात्र शेतकरी बांधवांनी थकबाकी देण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने महावितरणला हा कठोर निर्णय घ्यावा लागला असल्याचे अधिकाऱ्यांकडून बतावणी केली जात आहे.
Published on: 02 March 2022, 11:08 IST