राज्यातील मान्सूनने पुन्हा एकदा ब्रेक घेत आहे. वरुणराजा पुढील दहा दिवस राज्यातून गायबच राहणार आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
त्यानंतर आता पुन्हा राज्यातून पाऊस गायब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे कमबॅक होण्याची शक्यता आहे.ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वत्र पावसाने उघडीप घेतली होती. त्यानंतर महिन्याच्या शेवटी चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आली आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सून पुन्हा दणक्यात आगमन करण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा : संत्रा पिकाचा आंबिया बहारासाठी विमा हप्ता तिपटीने महागला
भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं की, 'आठवडाभर सरी कोसळल्यानंतर राज्यातून पुन्हा मान्सून गायब होण्याची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी पावसाची हजेरी लागेल. पण पावसाचे प्रमाण अत्यल्प असणार आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळू शकतात.
जुलै महिन्याच्या शेवटी वर्तवलेल्या सुधारित अंदाजात म्हटल्यानुसार, ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.मात्र पुढील किमान दहा दिवस राज्यात अशीच स्थिती राहणार असल्याचेही होसाळीकर यांनी सांगितले आहे. या आधीच मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवस राज्यात कोणताही इशारा दिला नाही.
Published on: 23 August 2021, 10:31 IST