मुंबई: मान्सूनचे आगमन 8 जून रोजी केरळात झाले आहे आणि 14 जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र राज्यातील उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनाला विलंब होऊ शकतो. 11 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल आणि काही भागांमध्ये दुपारनंतर मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस पडेल. राज्यातील बहुतांश भागात किमान 15 जूनपर्यंत तरी मान्सूनचे आगमन अपेक्षित नसल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस हा सलग पडत नाही. या काळात तापमान अधिक राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि हवामानाच्या सल्ल्यानुसार पुढचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याचबरोबर, वादळी पावसादरम्यान लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
Published on: 10 June 2019, 10:36 IST