News

राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर येलो मोझॅक विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सोबतच खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

Updated on 06 October, 2023 3:05 PM IST

१) राज्यातून मान्सून परतीचा प्रवास सुरु
देशातून परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरु झाला आहे. राज्यातून मुंबई, पुणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातून परतीच्या मान्सूनची वाटचाल सुरु झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मुंबई आणि पुण्यातून मोसमी वारे माघारी फिरले आहेत. यामुळे राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. राज्यात यंदा उशिराने मान्सून दाखल झाला. दरवर्षी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येणारा मान्सून यंदा 25 जूनला दाखल झाला. आता मान्सून राज्यातून माघारी परतण्यात सुरूवात झाली आहे.

२) सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव
राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर येलो मोझॅक विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सोबतच खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने बाधित पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानात झालेले बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम, नांदेड आदी जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव अधिक दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची वेळेत मदत मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.


३)विमा कंपन्यांना कृषिमंत्री धनंजय मुंडेंचा इशारा
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत कोविड काळातील ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देय आहे. ती ८ दिवसांत न दिल्यास पीक विमा कंपन्यांनी नियमानुसार होणाऱ्या कारवाईला तयार रहावे, असा इशारा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. तसंच २०२०-२१ मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास काही विमा कंपन्यांकडून विलंब होत आहे. त्याबाबत कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत मुंडे यांनी विमा कंपन्यांना इशारा दिला आहे.

४) 'राज्यात अद्यापही दुष्काळ का जाहीर नाही?'
राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात चारा-पाण्याची टंचाई आहे. आपल्या शेजारील राज्य कर्नाटकातही अशीच परिस्थिती असताना तेथील सरकारने १९५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मग राज्य सरकार राज्यात अद्यापही का दुष्काळ जाहीर करत नाही असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्यात ३५८ पैकी १९४ तालुके हे दुष्काळाच्या छायेत असून १६ जिल्ह्यांमध्ये ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक प्रभावित भागात पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा समावेश आहे.

५) अग्रीमसाठी विम्या कंपन्यांना हप्त्यापोटी ६२८ कोटी रुपये मंजूर
राज्यात यंदा पावसाचा चांगलाच खंड पडला आहे. यामुळे शेतपिकांचे नुकसान आहे. तसंच काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानेही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अग्रीम पीक विमा देण्याची मागणी होत आहे. यासाठी राज्य सरकारने विमा कंपन्याना शेतकऱ्यांच्या हिश्श्याच्या हप्त्याचे ६२८ कोटी रुपये वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

English Summary: monsoon update soybean news agriculture minister news
Published on: 06 October 2023, 03:05 IST