आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी ही फार जिव्हाळ्याची बातमी हाती आली आहे. धरतीच्या भेटीला वरुण राजा कधी येणार याची तारीख कळाली असून यंदा मॉन्सून केरळमध्ये १ जूनला धडकणार असल्याची माहिती केंद्रीय हवामान विभागाने दिली आहे.
जून महिन्याच्या पहिल्या दिवशी मॉन्सून येणार असल्याने मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना वेग येणार आहे. जर शेतकऱ्यांनो आपली कामे अजून बाकी असतील तर पटकन उरकून घ्या. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर १० जूनपर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होईल.
त्यानंतर १५ ते २० जूनदरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १५ मे आणि ३१ मे रोजी पावसाचा अधिकृत अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं असून त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेटच्या मान्सूनच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .६ मिमीच्या तुलनेत २०२१ मध्ये १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामध्ये ५ टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की, उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Published on: 06 May 2021, 03:01 IST