News

देशात यंदा मॉन्सून हा वेळेत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, यंदा मे महिन्यात एकामागे एक चक्रीवादळ देशात धडकल्यामुळे मॉन्सूनचे आगमन काही दिवसांनी पुढे गेले आहे.

Updated on 31 May, 2021 7:16 AM IST

देशात यंदा मान्सून हा वेळेत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, यंदा मे महिन्यात एकामागे एक चक्रीवादळ देशात धडकल्यामुळे मान्सूनचे आगमन काही दिवसांनी पुढे गेले आहे. नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवाह १ जूनपासून जोर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ५ दिवसात केरळात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रातही पुढील ४-५ दिवस मान्सून पूर्व पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मान्सूनच्या वाटचालीत कोणतीही प्रगती नसल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.शेतकरी हे खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. अशातच पावसाचा अचूक अंदाज मिळणे हे गरजेचे असते. राज्यात सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मॉन्सून केरळमध्ये ३ जूनला दाखल होईल. यामुळे मॉन्सून राज्यात दाखल होण्यास देखील चार ते पाच दिवसांचा विलंब होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होतंय, त्यामुळेच पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. याबाबत आयएमडीचे माजी प्रमख हवामानतज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी माहिती दिली. विशेषतः कोल्हापूर, सांगली ,सातारा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडू शकतो.

 

पावसाचे उद्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर आगमन होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने रविवारी हे आपल्या ताज्या अंदाजात सांगितले. केरळच्या किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागावर उद्या पावसाळा सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता विभागाने आपल्या ताज्या अंदाजानुसार व्यक्त केली आहे. जवळपास निम्म्या शेतजमिनीत सिंचन नाही आणि तांदूळ, कॉर्न, ऊस, कापूस आणि सोयाबीनची पिके घेण्यासाठी जून ते सप्टेंबरच्या वार्षिक पावसावर अवलंबून असतो. या पिकांसाठी पावसाचे वेळेवर आगमन महत्त्वाचे ठरते.

महाराष्ट्रातही मान्सून लांबणार

केरळात मान्सून उशीरा दाखल होणार असल्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. कोकणातही आता दोन दिवस उशीरा मान्सूनचे आगमन होणार आहे. कोकणात मान्सून १०जूनला दाखल होईन तर मुंबईत 12 पर्यंत पोहचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

राज्यात मान्सूनपूर्व पाऊस

राज्यात शनिवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पुणे, अहमदनगर, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात काल मान्सूनने हजेरी लावली. अवकाळी पावसाने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून भुईमूग काढणीला आल्याने शेतकरीही चिंतेत आहे.

English Summary: Monsoon to arrive in Kerala on June 3 instead of June 1
Published on: 31 May 2021, 07:16 IST