मॉन्सून राज्यासह देशात आपला रंग दाखवत असून आपल्या वेळेनुसार मॉन्सून योग्य दिशेने वाटचाल करत आहे. मंगळवारी मॉन्सून उत्तर प्रदेशात प्रवेश केला आहे. सात वर्षानंतर मॉन्सून ठरलेलेल्या वेळेत य़ुपीत दाखल होत आहे. महाराष्ट्रात मॉन्सून हजेरी लावत संपूर्ण राज्य व्यापले आहे. आज आमि उद्या गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक तसेच पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा कुलाबा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागानुसार, येणाऱ्या २४ तासांमध्ये आंध्रप्रदेश, ओडिशा, आसाम, अरुणाचल प्रदेशासह अनेक भागात हलक्या किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. राजस्थान, पंजाब, आणि हरियाणाच्या काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.
दरम्यान दिल्ली- एनसीआर सह काही राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर राजस्थानमधील काही भागात अजून उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मागील २४ तासात केरळ, कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग, कोकण, गोवा, दक्षिण गुजरात, उत्तर आणि मध्य महाराष्ट्र, पुर्वी मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, आणि पश्चिम बंगालमधील काही भागात पाऊस झाला. पुर्वी उत्तर प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. गुजरातमधील कच्छ भागातही दमदार पाऊस झाला. पुढील २४ तासात आंध्रप्रदेश, ओडिसा, कर्नाटक, केरळ, कोकण आणि गोवा, आसाम, अरुणाचल प्रदेशातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. नागालॅण्ड, बिहार, छत्तीसगड, मराठवाडा, मध्य प्रदेशातील काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.
Published on: 17 June 2020, 02:39 IST