Monsoon News: महाराष्ट्रात मान्सूनच्या (Monsoon) पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. जून महिन्याचा पहिला पंधरवडा राज्यातील जनतेला पावसाविना काढावा लागला होता. आता पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रिय झाला असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस मोठा दिलासा मिळाला आहे तसेच शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आता समाधानाचे भाव बघायला मिळत आहेत. दरम्यान भारतीय हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) गुरुवारी महाराष्ट्रातील अनेक भागात पावसासाठी (Rain) ऑरेंज अलर्ट जारी केला आणि पुढील 5 दिवस तयार राहण्याचे निर्देश देखील जनतेला दिले आहेत. तत्पूर्वी, RMC, मुंबईने गुरुवारी रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सिंधुदुर्गात आजही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, रत्नागिरीत गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आरएमसीने व्यक्त केली आहे. येत्या तीन दिवसांत मुंबईतही काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने देखील शुक्रवार ते रविवार दरम्यान "मध्य महाराष्ट्र" मधील घाट भागात एकाकी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आयएमडीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, पुढील पाच दिवसांत कोकण आणि गोवा, किनारी कर्नाटक आणि केरळ आणि माहे; 24 आणि 25 रोजी उत्तर कर्नाटक; 22, 25 आणि 26 रोजी गुजरात प्रदेश; 22 जून रोजी कोस्टल आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरापासून ईशान्य आणि लगतच्या पूर्व भारतापर्यंत तसेच उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये शनिवार आणि रविवारी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचेही यात सांगण्यात आले आहे. नैऋत्य वाऱ्याच्या प्रभावाखाली येत्या पाच दिवसांत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ही माहिती दिली आहे.
हवामान खात्याने एका निवेदनात म्हटले आहे की, "दार्जिलिंग, कलिमपोंग, जलपाईगुडी, कूचबिहार आणि अलीपुरद्वार आणि सिक्कीम या उप-हिमालयीन जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दक्षिण आणि नैऋत्य वाऱ्यांच्या प्रभावाखाली पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील नेओरा येथे मंगळवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत 24 तासांत सर्वाधिक 280 मिमी पावसाची नोंद झाली, तर मूर्ती 210 मिमी आणि नगरकाटा येथे 200 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Published on: 22 June 2022, 08:29 IST