News

नैर्ऋत्य मोसमी वारे मजल दरमजल करत उत्तरेकडे प्रगती करत आहे. मंगळवारी मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या आणखी काही भागात प्रगती करत मॉन्सूनने इंदौर, खजुराहो, फतेहपूर, बहारीचपर्यंत मजल मारली.

Updated on 18 June, 2020 6:15 PM IST


नैर्ऋत्य मोसमी वारे मजल दरमजल करत उत्तरेकडे प्रगती करत आहे. मंगळवारी मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या आणखी काही भागात प्रगती करत मॉन्सूनने इंदौर, खजुराहो, फतेहपूर, बहारीचपर्यंत मजल मारली. दोन दिवसांपासून गुजरातमधील मॉन्सूनची वाटचाल जैसे थे आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने सर्वसाधारण वेळेच्या एका दिवसाआधी मुंबई, पुण्य़ासह संपूर्ण राज्यात मॉन्सून पोहोचला. छत्तीसगड, झारखंड, व बिहारच्या संपूर्ण भाग सोमवारी मॉन्सूनने व्यापला आहे.

मध्यप्रदेश, गुजरात, पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागातही मॉन्सूनने प्रगती केली आहे. बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रिय असल्याने मंगळवारी मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशात प्रगती केली असून बुधवारी पुढे वाटचाल केली नाही. गुजरातमधील कांडला अहमदाबादपर्यंतची वाटचालही कायम आहे. राजस्थानपासून पूर्व उत्तर प्रदेशापर्यंत असलेला हवेचा पूर्व - पश्चिम कमी दाबाचा पट्टा पाकिस्तान बांग्लादेशापर्यंत विस्तारला आहे. पूर्व विदर्भ आणि परिसरावर ५.८ किलोमीटर उंचीवर, उत्तर कोकण आणि परिसरावर ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते मॉन्सूनचा वेग हा कमी असूनही मॉन्सूनने देशातील बहुतेक राज्यात धडक मारली आहे. अशात दिल्ली - एनसीआरमध्ये अजून मॉन्सून आलेला नाही. राजधानी दिल्लीमध्ये मॉन्सून हा वेळेआधीच येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीसह एनसीआरच्या शहरात मॉन्सून २७ जूनच्या आधी धडकणार आहे. दरवर्षी मॉन्सून हा २७ जूनला येत असतो. परंतु यावेळी मात्र दोन ते तीन दिवसाआधी मॉन्सून राजधानीत येणार आहे.

English Summary: monsoon move on right direction ; but speed is slow
Published on: 18 June 2020, 06:15 IST