मोदी सरकारने 2019 पासून पीएम किसान सम्मान निधि योजना गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दोन हजार रुपयांच्या तीन हफ्त्याच्या स्वरूपात दिले जातात.
दर चार महिन्यांनी पात्र शेतकर्यांना दोन हजार रुपयांचा एक हप्ता दिला जातो. या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत महाराष्ट्रातील एक कोटी 9 लाख 33 हजार 298 शेतकरी पात्र आहेत.
या योजनेचा मध्यंतरी अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता म्हणून केंद्र सरकारने या योजनेत मोठा आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. या योजनेसाठी आता पात्र शेतकर्यांना आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे तसेच आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असणे अनिवार्य राहणार आहे. ज्या लोकांनी आधार प्रमाणीकरण केले नसेल तसेच त्यांच्या बँक खात्याशी आधार संलग्न नसेल त्या लोकांना आता या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. राज्यातील सुमारे 21 लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तसेच बँक खात्याला आधार जोडलेले नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे काम करावे लागेल नाहीतर त्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागू शकते.
या योजनेसाठी सुमारे एक कोटी 6 लाख 53 हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. मात्र अजूनही पावणेतीन लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आधार कार्ड दिले नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण शक्य झाले नाही तर काहींच्या आधार कार्ड मध्ये त्रुटी असल्याने आधार प्रमाणीकरण शक्य झालेले नाही. दरम्यान केंद्र सरकारने सांगितले की, एप्रिल-मे च्या सुमारास मिळणारा अकरावा हप्ता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न आहे. या अनुषंगाने राज्यातील सुमारे एक कोटी 6 लाख 53 हजार शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरण झाले आहे.
असे असले तरी या पैकी 17 लाख 78 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड संलग्न केलेले नाही. केंद्र सरकारच्या नव्या निकषानुसार या योजनेसाठी आधार प्रमाणीकरण झालेले असले तरीदेखील बँक खात्यास आधार कार्ड संलग्न असलेले अनिवार्य आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ बँकेत जाऊन आधार कार्ड संलग्न करणे महत्त्वाचे आहे. नाही तर शेतकऱ्यांना अकराव्या हफ्त्यापासून वंचित रहावे लागू शकते. यामुळे राज्यातील जवळपास 21 लाख शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकतात. राज्यातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ बँकेत जाऊन आधार कार्ड संलग्न करणे महत्त्वाचे राहणार आहे.
Published on: 02 April 2022, 11:18 IST