भारत सरकार (Government Of India)ने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत (Pradhanmantri garib kalyan yojana)मे आणि जून 2021 पर्यंत मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मे आणि जून 2021 या महिन्यात गरीबांना 5 किलो मोफत धान्य उपलब्ध करुन देण्यात येईल.
सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यात येणार आहे. कोविड (Covid-19)साथीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या वेळी त्यांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सध्याची COVID-19 परिस्थिती पाहता या उपक्रमासाठी केंद्र 26,000 कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहे. भारतात कोरोना व्हायरस ग्रस्तांचे सर्व 'रेकॉर्ड' तोडत असताना ही घोषणा केली गेली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात देशात कोरोना विषाणूची 3.32 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
देशात आतापर्यंत झालेल्या 1,86,920 मृत्यूंपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 62,479 मृत्यू आहेत. त्यानंतर कर्नाटकात 13,885 मृत्यू, तामिळनाडूमध्ये 13,317 मृत्यू, दिल्लीत 13,193 मृत्यू, पश्चिम बंगालमध्ये 10,766 मृत्यू, उत्तर प्रदेशात 10,541 मृत्यू, पंजाबमध्ये 8,189 मृत्यू आणि आंध्र प्रदेशात 7,541 मृत्यू आहेत. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की 70 टक्के पेक्षा जास्त मृत्यू इतर गंभीर आजारांमुळे होतात.
राज्यातील नागरिकांना मे आणि जून महिन्यात मिळणार मोफत धान्य
महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्यास केंद्र शासनाने (Central Government ) परवानगी दिली आहे. यासंदर्भातील मागणी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल आणि खासदार शरद पवार यांना पत्र लिहून केली होती.आज या संदर्भात केंद्र सरकारने मे आणि जून महिन्यांसाठी मोफत 5 किलो धान्य देणार असल्याची घोषणा केली असल्याने राज्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्राद्वारे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे गरीब आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्राला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची पुन्हा एकदा गरज असल्याने ती सुरू करण्याची मागणी केली होती.
Published on: 25 April 2021, 06:30 IST