News

जमिनीच्या भौतिक सुपिकतेचा अभ्यास केला असता जमिनीची घनता कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हवा व पाणी यांचे जमिनीमधील संतुलन योग्य राखले गेले. रासायनिक गुणधर्मांमध्ये प्रामुख्याने सेंद्रिय कर्बामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे (०.७७ टक्क्यापासून ०.९८ टक्क्यांपर्यंत) दिसून आले. उपलब्ध अन्नद्रव्यात नत्र, स्फुरद व पालाश मध्ये अनुक्रमे ६७, २० आणि १४५ किलो प्रति हेक्टरी इतकी वाढ झाल्याचे दिसून आले.

Updated on 23 December, 2023 1:27 PM IST

डॉ.एस.के.घोडके, डॉ.एम.एस.माने, डॉ.आर.एल.भिलारे

महाराष्ट्रामध्ये ऊस पिकाखालील क्षेत्र जवळजवळ १०-१२ लाख हेक्टर असते तसेच दर हेक्टरी उत्पादकता ८०-९० टन दरम्यान दिसून येते. राज्याची दर हेक्टरी उत्पादकता ही फारच कमी दिसून येते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे आहे. कारण राज्यातील एकूण ऊस क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र खोडव्याचे आहे. मात्र एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा फक्त २० ते २५ टक्के इतकाच आहे. म्हणून ऊस पिकाचे सरासरी प्रति हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या ऊसाइतकेच खोडवा पिकास महत्व देणे आवश्यक आहे. परंतु खोडवा व्यवस्थापनाकडे पाहिजे त्या पध्दतीने लक्ष न दिल्याने खोडव्याची उत्पादकता कमी झाल्याचे दिसून येते. खोडवा पिकाची जोपासना आधुनिक तंत्राने केल्यास खोडव्याचे उत्पादन लागणीच्या ऊसा इतकेच येऊ शकते, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त येऊ शकते, असे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगांव येथील संशोधनावरुन दिसून आले आहे.

ऊसाच्या पाचटामध्ये ०.५ टक्के नत्र, ०.२ टक्के स्फुरद आणि ०.७ ते १ टक्के पालाश असते आणि ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब असते. असे पाचट जाळल्यास त्यातील सेंद्रिय कर्बाचा पूर्णतः नाश होतो. पाचटातील नत्र आणि स्फुरदाचा ९० टक्केहून अधिक भाग जळून जातो. केवळ पालाश काही प्रमाणात शिल्लक राहते. या सर्व बाबींचा विचार करुन पाचटाचा खोडव्यामध्ये वापर करण्याच्या दृष्टीने प्रयोग घेण्यात आले. त्यात असे आढळून आले की, एक हेक्टर क्षेत्रामधून ८ ते १० टन पाचट मिळते आणि त्यापासून ४० ते ५० किलो नत्र, २० ते ३० किलो स्फुरद, ७५ ते १०० किलो पालाश आणि ३ ते ४ हजार किलो सेंद्रिय कर्ब जमिनीत घातले जाते.

महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणा-या खोडवा पिकामध्ये पाचटाचा वापर मात्र २ टक्के क्षेत्रावरही होत नाही. हे थांबविण्यासाठी पाडेगांव येथे खोडव्यात पाचट, सुरुवातीच्या कालावधीमध्ये आच्छादन म्हणून आणि नंतर हयाच पाचटाचे जागेवरच चांगले सेंद्रिय खत तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे, आणि त्याचे निष्कर्ष फारच परिणामकारक आहेत. हे दृष्य परिणाम पाडेगांव येथील संशोधन प्रक्षेत्रावर पाहून शेतक-यांनी ते आपल्या शेतावर आमलात आणले आहेत. त्याचे क्षेत्रदेखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे सर्व ऊस उत्पादक शेतक-यांना विनंती की ऊसाची पाचट न जाळता खोडव्यामध्ये हया नैसर्गिक साधन संपत्तीचा पुनश्चः वापर करुन खोडवा व्यवस्थापन करावे. त्यामुळे खोडव्याचे उत्पादनात वाढ होतेच शिवाय जमिनीची सर्व प्रकारची सुपिकता व उत्पादकता देखील वाढते.


खोडवा पिकापासून होणारे फायदे :
१. लागण ऊसाप्रमाणे खोडवा पिकासाठी पूर्वमशागत करावी लागत नसल्याने जमिनीतील पूर्वमशागतीवरील खर्च वाचतो. त्यामुळे साधारणपणे सुरु ऊसासी तुलना करताना हेक्टरी रु.१२००० ते १५००० इतकी खर्चात बचत होते.
२. पूर्वमशागतीवरील खर्चाबरोबरच शेताच्या तयारीसाठी लागणारा वेळ आणि श्रम यांची बचत होते.
३. खोडवा घेतल्यामुळे ऊस लागवडीसाठी लागणारे ऊस बेणे, बीजप्रक्रिया व ऊस लागवड इत्यादी बाबतीत खर्चात बचत होते. साधारणपणे सुरु ऊसासी तुलना करताना प्रति हेक्टरी रु.२१०००/-पर्यंतच्या खर्चाची बचत होते.
४. खोडवा पिकास फुट होण्यासाठी जमिनीतील कांडयावर भरपूर डोळे असतात. त्यामुळे ऊसांची संख्या लागणीच्या ऊसापेक्षा जास्त मिळते.
५. खोडवा पीक पाण्याचा ताण जास्त प्रमाणात सहन करते, त्यामुळे पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात फारशी तफावत पडत नाही.
६. खोडवा पिकात पाचटाचा पूर्ण वापर करणे सहज शक्य होते. पाचटाचा आच्छादन म्हणूनही उपयोग होत असल्याने पाण्याची कमतरता असल्यास खोडवा पीक चांगले तग धरते.

खोडवा पीक घेतांना विचारात घ्यावयाच्या बाबी
१. सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या ऊसाचाच खोडवा ठेवणे फायदेशीर ठरते. त्याच्यानंतर खोडवा घेतल्यास खोड किडींचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होतो.
२. ज्या ऊस लागणीच्या ऊसाचे उत्पादन हेक्टरी १०० टन आणि ऊस संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे, अशा ऊसाचाच खोडवा ठेवावा.
३. ऊस पीक विरळ झाल्यास नांग्या भराव्यात. नांग्या भरण्यासाठी प्लास्टिकच्या / पॉलिट्रेमधील तयार केलेली रोपे वापरावीत. किवा सुपरकेन नर्सरीचे तंत्रज्ञान वापरावे.
४. खोडवा पीक हे हलक्या, कमी खोलीच्या तसेच निचरा न होणा-या क्षारपड अथवा चोपण जमिनीत घेऊ
नये.
५. शिफारस केलेल्या ऊस जातींचाच खोडवा ठेवावा.

खोडवा राखण्याची योग्य वेळ :
पाडेगांव येथे झालेल्या संशोधनानुसार १५ फेब्रुवारी पर्यंतच तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवणे फायदेशीर असल्याचे दिसून आले. वेगवेगळया हंगामापैकी पूर्वहंगामी तुटलेल्या ऊसापासून ठेवलेल्या खोडव्याचे उत्पादन आडसाली व सुरु ऊसापासून ठेवलेल्या खोडव्यापेक्षा जास्त येते.

जमिनीच्या भौतिक सुपिकतेचा अभ्यास केला असता जमिनीची घनता कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हवा व पाणी यांचे जमिनीमधील संतुलन योग्य राखले गेले. रासायनिक गुणधर्मांमध्ये प्रामुख्याने सेंद्रिय कर्बामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे (०.७७ टक्क्यापासून ०.९८ टक्क्यांपर्यंत) दिसून आले. उपलब्ध अन्नद्रव्यात नत्र, स्फुरद व पालाश मध्ये अनुक्रमे ६७, २० आणि १४५ किलो प्रति हेक्टरी इतकी वाढ झाल्याचे दिसून आले.

खोडवा ऊसात पाचटाचा वापर :
ऊस तोडणीनंतर ऊसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटावे व ऊसाचे बुडखे मोकळे करावेत जेणेकरुन त्यावर सुर्यप्रकाश पडून येणारे नविन कोंब जोमदार येतील. ऊसाचे बुडखे मोठे राहील्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते. जमिनीखालील येणारे कोंब जोमदार असतात. बुडख्यांची छाटणी न केल्यास जमिनीवरील कांडीचे डोळे फुटतात. असे येणारे फुटवे कमजोर असतात व क्वचितच त्यांचे मुख्य ऊसात रुपांतर होते. त्यामुळे जमिनीलगत बुडखे छाटणे महत्वाचे आहे.

बुडख्याच्या छाटणीनंतर ०.१ टक्के कार्बेन्डॅझीम या बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यासाठी १० ग्रॅम कार्बेन्डॅझीम १० लिटर पाणी या प्रमाणात द्रावण करुन फवारणी करावी. त्यामुळे मातीतून येणा-या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो.

खोडव्यामध्ये पाचटाचा सुरुवातीला आच्छादन म्हणून उपयोग करुन घ्यावयाचा असल्याने ते हळूहळू कुजणे आवश्यक आहे. तसेच चार ते पाच महिन्यानंतर पाचट शेतातच कुजून जावे म्हणून पसरलेल्या पाचटावर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० किलो पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धन सम प्रमाणात पसरुन टाकावे. सुरुवातीला स्वतंत्र जीवाणू संवर्धन पाचटावर समप्रमाणात शेणगाराकरुन पसरुन टाकावे. त्यानंतर ऊसास पाणी द्यावे. पाणी देण्यापूर्वी प्रथम पाण्याचे पाट दुरुस्त करावेत. पाचटामुळे सुरुवातीस पाणी पोहचण्यास वेळ लागतो. तरी सर्वत्र पाणी पोहचेल याची काळजी घ्यावी. जमीन ओली असतांना सरीतील पाचट पायाने थोडे दाबून घ्यावे किंवा शेतात जनावरे मोकळी सोडावीत. जनावरांच्या पायाने पाचट दाबण्यास मदत होते. पाचटाचा मातीशी संपर्क येवून ती हळूहळू कुजण्याची क्रिया सुरु होते.

वरील पाचट वापरण्याचे तंत्र योग्यप्रकारे आमलात आणण्यासाठी त्याची तयारी ऊस लागणीपासूनच करावयाला हवी. यासाठी ऊसाच्या दोन सरीमधील अंतर कमीत कमी १.२० मिटर (४ फुट) असावे किंवा जमिनीच्या मगदूराप्रमाणे रुंद सरी अथवा जोडओळ पध्दत २.५ बाय ५ फुट किंवा ३ बाय ६ फुट पट्टा सोडून लागण करावी. पट्ट्यात पाचट व्यवस्थित बसते व फुट चांगली होते.

रासायनिक खतांचा वापर :
खोडव्याला पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वापसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावी. खते देण्यासाठी पाडेगांव येथे विकसित केलेल्या नविन पध्दतीचा अवलंब करावा.
सदर पध्दतीनुसार रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या साधनाच्या सहाय्याने (आकृती क्र. १) जमिनीत वापसा असतांना, दोन समान हप्त्यात द्यावी (तक्ता क्र. १ ). पहीली ५० टक्के खत मात्रा १५ दिवसाच्या आतच पूर्ण करावी. पहारीने बुडख्यापासून १० ते १५ सें. मी. अंतरावर, १० ते १५ सें.मी. खोल छिद्र घेवून सरीच्या एका बाजूला पहिली खत मात्रा द्यावी. दोन छिद्रामधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. दुसरी खतमात्रा विरुध्द बाजूस त्याच पध्दतीने १३५ दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.

सुक्ष्मअन्नद्रव्य :
ऊसाची तोडणी केल्यानंतर नवीन येणारे फुटवे पिवळे किंवा केवडा पडल्यासारखे दिसतात अशा जमिनीची मातीची तपासणी करावी, त्यानुसार सुक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता असल्यास हेक्टरी २० किलो झिंक सल्फेट २५ कि लो फेरस सल्फेट, १० किलो मँगनिज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स ही खते वापरावीत. सुक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करतांना ते चांगले कुजलेल्या शेणखत किंवा कंपोष्ट खतात मिसळून त्या ढिगावर थोडे पाणी शिंपडावे व ५ ते ६ दिवसांनी खताच्या पहिल्या हप्त्याच्या वेळी टाकावे. शेणखत व सुक्ष्मअन्नद्रव्य यांचे प्रमाण १०:१ असे ठेवावे.

जीवाणू खतेः
ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम व स्फुरद विरघळविणारे जीवाणू यांचा प्रत्येकी १.२५ किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात एकूण ५ किलो जीवाणू खतांचा वापर केल्यास वर दिलेल्या नत्र आणि स्फुरदाच्या मात्रा २५ टक्क्यांनी कमी कराव्यात. हे जीवाणू खत पहिले पाणी दिल्यानंतर जमीन वापशावर असतांना ऊसाच्या बुडख्यापासून बाजूला चळी घेवून चांगले कुजलेल्या शेणखतामध्ये अथवा मातीमध्ये मिसळून द्यावे. किंवा शेणाच्या स्लरीमध्ये किंवा पाण्यामध्ये एकत्र मिसळून वापरावे.

खोडवा ठेवताना जिवाणू खतांची मात्रा दिली नसल्यास खोडवा ठेवल्यानंतर दोन महिन्यांनी हेक्टरी १ लिटर द्रवरूप ॲसेटोबॅक्टर जीवाणू संवर्धन ५०० लिटर पाण्यात मिसळून सकाळच्या वेळेस फवारणी करावी व १.२५ किलो स्फुरद विरघळणारे जीवाणू १०० किलो कंपोस्ट खतात मिसळून सरीमधून द्यावे.

पहारीच्या साधनाने रासायनिक खत वापरण्याचे फायदे :
१. खत मुळांच्या सानिध्यात दिले जाते, त्यामुळे ते पिकास त्वरीत उपलब्ध होते.
२. दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्याने ते वाया जात नाही.
३. खत खोलवर व झाकून दिल्यामुळे वाहून जात नाही.
४. या पध्दतीने तणांचा पार्दुभाव कमी दिसून येतो.
५. रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्धता होवून खतांची कार्यक्षमता वाढते व जोमदार वाढ होवून ऊसाचे भरघोस उत्पादन मिळते
६. सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्य होते, त्यामुळे सर्वत्र सारख्या उंचीचे व जाडीचे पीक आल्यामुळे ऊस उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते.

आंतरमशागत :
या पध्दतीमध्ये कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करण्याची गरज नाही. म्हणजेच जारवा तोडण्यासाठी किंवा बगला फोडून पिकाला भर देण्याची गरज नाही. जून्या मुळया आपोआप कुजून जातात व परत नविन मुळया फुटतात. पाचटाचे आच्छादन असल्यामुळे आणि खते पहारीच्या सहाय्याने दिली असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव फारच कमी प्रमाणात होतो. त्यामुळे खुरपणी करावी लागत नाही. फक्त काही तणे उगवल्यास ती उपटून टाकावीत.

पाणी नियोजन :
खोडवा व्यवस्थापनासाठी नेहमीच्या पध्दतीने २६ ते २८ पाण्याच्या पाळया लागतात. परंतु नविन तंत्रामध्ये फक्त १३ ते १४ पाण्याच्या पाळया असल्या तरी उत्पादन चांगले मिळते. तरीपण सर्वसाधारणपणे खोडवा ऊसासाठी दोन पाण्याच्या पाळीतील अंतर नेहमीच्या पध्दतीपेक्षा दीडपटीने वाढवावे. उन्हाळयामध्ये नेहमीच्या पारंपारिक पध्दतीमध्ये पाण्याचा तुटवडा भासल्यास ऊसाच्या उत्पादनात फार मोठी घट येते. परंतु नविन पध्दतीत पाचटाचा आच्छादनासाठी वापर केल्यामुळे, ४० ते ४५ दिवस पाणी नसले तरी ऊसाचे पीक तग धरु शकते. त्यामुळे ही पध्दत ज्या भागात उन्हाळयामध्ये पाण्याचा तुटवडा भासतो, अशा भागातील लोकांना वरदानच ठरु शकते.

पीक संरक्षण :
खोडवा पिकात गवताळ वाढ व मर या रोगाचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी अशी रोगग्रस्त बेटे उपटून काढावीत. खोड किड नियंत्रणासाठी क्रोरॅनटॅनिलीप्रोल ०.४ टक्के दाणेदार १८.७५ कि / हे या प्रमाणात द्यावे. ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकाचा (२ लाख प्रति हेक्टरी) खोड किडीच्या नियंत्रणासाठी उपयोग करावा.

खालील गोष्टी कटाक्षाने टाळाः
१)पाचट जाळणे
२)बुडख्यांवर पाचट ठेवणे
३) पाण्याचा अतिवापर करणे
४)रासायनिक खतांचा फोडुन वापर करणे
खोडव्यामध्ये पाचट ठेवून पहारीने खत देण्याच्या पध्दतीने खोडव्याचे व्यवस्थापन केल्यास नेहमीच्या पाचट जाळणे, बगला फोडणे, आंतरमशागत, बांधणी करणे या पध्दतीपेक्षा १५ टन जादा ऊस उत्पादन मिळाले. खोडवा पिकामध्ये पाचट ठेवून, पहारीने खते देवून, कमीत कमी मशागत करुन खोडवा व्यवस्थापन केल्यास खर्चात तर बचत होतेच शिवाय जमिनीची सुपिकता टिकवून ऊस व साखर उत्पादन जादा मिळते. यासाठी महाराष्ट्रातील समस्त ऊस शेतकरी बंधूंनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. अधिक माहीतीसाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगांव येथे संपर्क साधावा.

English Summary: Modern Sugarcane Weed Management Sugarcane season
Published on: 23 December 2023, 01:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)