News

उत्तर कोरेगावातील 26 गावात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांनी यावर काम सुरु केले आहे.

Updated on 21 April, 2025 2:44 PM IST

सातारा : कृत्रिम बुद्धिमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा सगळ्या क्षेत्रात वापर व्हायला लागला आहे. राज्य सरकारनेही अनेक विभागांमध्ये त्याचा अंतर्भाव केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 500 कोटीची तरतूद एआय करिता केली आहे. शेतकऱ्यांनी कमी पाणी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त कृषि उत्पन्न मिळवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन ऊस, कांदा, सोयाबीन, कापूस यासह फळबागांची आधुनिक शेती करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कोरेगाव तालुक्यातील पिपोंडे बु. येथील बाजार पटांगणात नागरी सत्कार शेतकरी मेळाव्यात आयोजित सभेत ते बोलत होते. कार्यक्रमास मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादन खर्च कमी करता येतो, खात्रीशीर जास्त उत्पादन मिळवता येते, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आजच्या घडीला शेतीबाबतीत मोबाईलवर शेती पीक, पाणीवापर, अचूक खत व्यवस्थापन, जमिनीचा पोत, किड नियंत्रण, हवामानविषयक अचूक माहिती, पिकांसाठी शाश्वत बाजारपेठ आदी सर्व माहिती उपलब्ध होते. या तंत्रज्ञानाचा वापर केला तरच शेतीचे उत्पन्न वाढवता येईल. शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञान आधारित आधुनिक शेती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिथे जिथे शेतकऱ्यांना अडचण येईल तिथे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे राहील, शेतकऱ्यांच्या विकासासाठी निधीची अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळबागांना शाश्वत बाजार पेठ मिळवून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.

उत्तर कोरेगावातील 26 गावात शेतीच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांनी यावर काम सुरु केले आहे. सोळशी येथील प्रस्तावित धरण हे महाबळेश्वर तालुक्यात येत असून याच्या सर्वेक्षणाला आणि धरणाच्या कामासाठी प्राथमिक तरतूद केली आहे. येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेद्वारे यावर मार्ग काढला जाईल.

यावेळी मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी वारंवार दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या तालुक्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी शासन सर्वोच प्राधान्य देत असल्याचे सांगून या करीता निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत पूनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांचा दिमाखदार नागरी सत्कार करण्यात आला.

English Summary: Modern orchard farming should be done using artificial intelligence AI technology Deputy Chief Minister Ajit Pawar
Published on: 21 April 2025, 02:44 IST