News

समुद्रावरून वाहणारे वारे आणि मध्य प्रदेशच्या परिसरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्याच्या काही भागात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील काही भागात पुढील काही दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

Updated on 30 August, 2020 9:15 AM IST


समुद्रावरून वाहणारे वारे आणि मध्य प्रदेशच्या परिसरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्याच्या काही भागात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील काही भागात पुढील काही दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी हवामानासह पावसाची उघडीप राहिल. कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सध्या दक्षिण उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. मॉन्सूनची आस असलेला पट्टा बिकानेरपासून ते बंगालच्या उपसागारादरम्यान सक्रिय आहे. यासह तामिळनाडू ते कोमोरिन परिसराच्या उत्तर दक्षिण भागादरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. दरम्यान कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात प्रामुख्याने घाटक्षेत्रांमध्ये गेल्या चोवीस तासांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. कोकण विभागात पुढील दोन दिवस, तर मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात रविवारीही (३० ऑगस्ट) काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. मध्य प्रदेशपासून उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागापर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. या स्थितीमुळे राज्यात प्रामुख्याने विदर्भ, कोकण भागांत दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. या पट्टय़ाची तीव्रता कमी होणार असल्याने विदर्भात पावसाचा जोर कमी होईल. गेल्या दोन दिवसांपासून या भागांत जोरदार पाऊस झाल्याने नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. कोकण विभागात मुंबई आणि ठाण्यासह विविध ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. मध्य महाराष्ट्रातील घाट विभागातही मुसळधार सरींची हजेरी आहे.

English Summary: Moderate rainfall forecast for the state
Published on: 30 August 2020, 09:15 IST