सध्या हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आपल्या हातात असणाऱ्या स्मार्टफोनमुळे तर जग अगदी जवळ आले आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक गोष्टी जसे की बाजारपेठ, बाजारपेठेतील शेतमालाचे भाव, शेती क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञान अगदी सहजपणे समजते.
याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने एक अनोखे ॲप आणले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या ॲपच्या उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या ॲपच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना शेती मालाचे बाजार भाव आता घरबसल्या कळणार आहेत.
त्यामुळे या मोबाईल ॲपचा वापर शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर करावा असे आवाहन मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांनी केले. सध्या शेतकरी वर्गाकडे देखील मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोन असून कृषी पणन मंडळ राबवित असलेले विविध प्रकल्प,योजना तसेच विविध उपक्रम तसेचपिकाचे बाजार भाव, बाजार समित्या व बाजार घटक तसेच सर्वसामान्यांना सहज रित्या उपलब्ध करून देण्यासाठी कृषी पणन मंडळाने हे मोबाईल ॲप अद्ययावत केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना राज्यातील बाजार समित्यांमध्ये होणारी शेतमालाची दररोजची आवक व बाजार भाव तसेच बाजार समिती यांचे संक्षिप्त माहिती, शेतकरी उत्पादक कंपनी यांची माहिती, सुगी पश्चात तंत्रज्ञान तसेच फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण, कृषी पणन मित्र मासिक इत्यादी प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे.
शेतमालाची थेट विक्री अथवा खरेदी करण्यासाठी विक्रेता व त्याचा शेतमाल आणि खरेदीदार व त्याचा शेतमाल याबाबत माहिती प्रसिद्ध करण्याची सुविधा या ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे मोबाईल ॲप गूगल प्ले स्टोर अथवा ॲप स्टोअर वर एमएसएएमबी या नावाने मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.(स्त्रोत-इंडियादर्पण)
Published on: 30 January 2022, 11:42 IST