Onion News :
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्याासाठी दिल्लीत महत्त्वाची बैठक होत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीतून राज्यातील जबाबदार मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पण याकडे राज्यातील मंत्र्यांनी पाठ फिरवली आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन टीका केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्नी बोलाविलेल्या बैठकीकडे महाराष्ट्रातून जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत. कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी हि बैठक अतिशय महत्त्वाची आहे. या बैठकीसाठी प्रमुख कांदा उत्पादक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राज्यातील प्रमुख मंत्री यांना आमंत्रित केले की नाही याचे उत्तर राज्य सरकारने देणे आवश्यक आहे. जर आमंत्रित करुन देखील ते बैठकीला गेले नसतील, तर या बैठकीकडे पाहण्याचा राज्य शासनाचा दृष्टीकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील आहे हे स्पष्ट आहे.
वास्तविक केंद्र शासनाच्या असंवेदनशील धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील कांदा उत्पादकांची बाजू केंद्रात जोरकसपणे मांडण्यासाठी महाराष्ट्रातील जबाबदार मंत्र्यांनी जाणे आवश्यक होते. परंतू या बैठकीला ते उपस्थित नसणे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही असे म्हणता येईल.
तसंच या ट्विटवर कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं आहे. दिल्लीतील मिंटीग झाल्यावर मंत्री सत्तार आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अब्दुल सत्तार यांना सुप्रिया सुळे यांनी केलेल्या ट्विटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सत्तार म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्या ट्विटचं मला आश्चर्य वाटतं, असं उत्तर सत्तार यांनी दिलं आहे.
Published on: 29 September 2023, 02:10 IST