
Flood Update
अलिबाग : आगामी मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर आज रोजगार हमी योजना, खारभूमी विकास विभाग मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती उपाययोजना आढावा बैठक शासकीय विश्रामगृह महाड येथे पार पडली.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे,जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा विखे,कार्यकारी अभियंता महेश नामदे ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे, एनडीआरएफ, कोस्ट गार्डचे अधिकारी यांसह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी मंत्री गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील वीज पुरवठा, सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट, पूल दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, वाहतूक, कृषी बागायतदारांना नुकसान भरपाई, आरोग्य, नैसर्गिक आपत्ती प्रसंगी उपयोगी पडणारी तात्पुरती निवारागृहे, धोकादायक ठिकाणे व तेथील उपाययोजना, पोलीस व स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण कक्ष, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा आदी विषयांबाबत सविस्तर आढावा घेतला.
नैसर्गिक आपत्तीत सर्व यंत्रणांनी सतर्क व सुसज्ज राहावे, आपापसात योग्य तो समन्वय साधावा, जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून काम करावे, नागरिकांच्या आरोग्याची आवश्यक ती काळजी घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हा प्रशासनाच्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
Share your comments