हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हयातनगर येथिल एका शेतकरी कुटुंबाने शेतीत नवीन प्रयोग केला आहे. येथिल कोंडे शेतकरी पित्रा पुत्राने शेतात पानमळ्याची शेती करुन चांगले उत्पन्न मिळवले आहे. या पिता पुत्राने मामाच्या पानमळ्याची शेती पाहून पानमळा करायचा निर्णय घेतला होता. आणि त्यातून त्यांना आता लाखोंचे उत्पन्न सुरु झाले आहे.
नागेली पान वेलीची लागवड करण्यासाठी कोंडे यांनी अगोदर पाच फूट रुंदीवर वेलींना आधार देण्यासाठी शेवरीची लागवड केली. त्यानंतर शेवरी मोठी होऊन उंच वाढल्यावर मागच्या वर्षी जुलै महिन्यात ३० हजार कांडी रोप पानाची पाच बाय दोन फुट अंतरावर शेवरीच्या बुंध्याशेजारी लागवड केली.लागवडीनंतर सहा महिन्याला नागेली पाने लगडण्यास सुरुवात होऊन काढणीस प्रारंभ झाला.
पानवेलीची लागवड सुरु झाल्यानंतर त्यांनी पिकाला शेणखताचा मात्रा दिला. त्यामुळे उत्पादन चांगले मिळाले. तसंच पान व वेलीवर सरासरी रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. पण या मळ्याला पाणीमात्र एक दिवसाआड द्यावे लागत असल्याने त्यांनी तिही काळजी घेतली. कोंडे रोजच पानांची काढणी करुन त्याची वसमत, नांदेड, परभणी, पूर्णा येथील बागवानाला विक्री करतात.
दरम्यान, दररोज दहा हजार नागेली पाने निघतात. त्यास प्रति शेकडा आठशे रुपये दर मिळतो. आठ गुंडे पानमळा लागवड व उत्पादनासाठी त्यांना पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आला असून आजवर दिड लाख रुपये पान विक्रीतून निव्वळ नफा मिळाला आहे. तर हे पीक पुढे तीन वर्षे चालणार असून त्यातून त्यांना पाच लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. या आधी देखील त्यांनी पानमळ्यापासून जवळपास चार लाख रुपये नफा घेतला आहे.
Published on: 03 August 2023, 04:31 IST