खानदेशात प्रत्येक स्वयंपाक घरातील एक अभिन्न अंग म्हणजे बाजरी. खानदेशात बाजरीच्या भाकरी वीणा स्वयंपाक अधूरा असतो असे बोलले जाते. खानदेश समवेतच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ग्रामीण भागात बाजरीच्या भाकरीला गव्हाच्या चपाती पेक्षा अधिक महत्त्व आहे, येथील ग्रामीण भागातील लोक बाजरीची भाकरीच अधिक खाणे पसंत करतात. अशा या बाजरीला वर्षानुवर्ष अतिशय अल्प बाजार भाव प्राप्त होत असे. मात्र आता चित्र काहीसं पलटल आहे, आता बाजरीने गव्हाला धोबीपछाड देत विक्रमी बाजार भाव प्राप्त केला आहे.
बाजरीला मिळत असलेला कवडीमोल बाजार भाव तसेच उत्पादनासाठी केला जाणारा आटापिटा आणि त्यातून प्राप्त होणारे थोकडं उत्पन्न या साऱ्यांना कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी बाजरी पिकाकडे पाठ फिरवली आणि अन्य नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की बाजरीच्या उत्पादनात कमालीची घट नमूद करण्यात आली. गव्हापेक्षा आता बाजरीलाच अधिक बाजारभाव मिळत असल्याने गरिबा घरची बाजरी देखील आता श्रीमंतीची चव चाखणार एवढं निश्चित. बाजरीला मिळत असलेला विक्रमी बाजार भाव सध्या शेती क्षेत्रातील वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. आणि यामुळे अनेकांना आश्चर्याचा मात्र सुखद धक्का देखील बसला आहे.
शेतकरी मित्रांनो सध्या बाजरीला 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव प्राप्त आहे. पिढ्यानपिढ्या कवडीमोल दरात विकली जाणारी बाजरी अनेक वर्षानंतर कडाडली आहे. पूर्वी ग्रामीण भागात खाल्ली जाणारी बाजरीची भाकर आता फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये देखील उपलब्ध झाली आहे. काही रेस्तराँमध्ये बाजरीच्या भाकरी स्पेशल झाल्या आहेत. बटर नान, तंदुरी रोटी यापेक्षाही अधिक आता बाजरीच्या भाकरीला खवय्ये पसंती दर्शवित आहेत. तसेच वर्षानुवर्षे मजूर वर्गांच्या घरात बाजरीची भाकर बनवली जात आहे. त्यामुळे बाजरीच्या वाढलेल्या दराचा फटका मजूर वर्गाला बसण्याची शक्यता आहे. बाजरीचे वाढलेले तर मजूर वर्गाची भाकर करपुन टाकेल एवढे नक्की.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात की, बाजरीचे पीक हे संपूर्ण मजुरांवर अवलंबून असते. पेरणी केल्यापासून ते काढणी करेपर्यंत मजुरांची खुशामत करावी लागत असल्याने व उत्पादन खर्च आणि उत्पन्न यामध्ये ताळमेळ बसत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बाजरी पिकापासून तोबा केला. आणि त्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली आणि एकंदरीत तयार झालेल्या समीकरणामुळे बाजरीचे बाजार भाव चांगलेच कडाडले. बाजरीचे क्षेत्र घटले बाजरीचे उत्पादनही घटले मात्र घटली नाही ती फक्त बाजरीच्या भाकरी वरची खवय्यांची पसंती. आजही खांदेशात ग्रामीण भागातील नव्हे-नव्हे तर खानदेशातील शहरी भागात देखील महिलांची पहिली पसंत आणि शेवटची पसंत ही बाजरीची भाकरीच ठरते.
बाजरी कधीकाळी उत्तर महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात पिकवली जात असे मात्र आता उत्तर महाराष्ट्रातून बाजरीचे पिक जवळपास नाहीसे होण्याच्या मार्गावरच आहे आणि म्हणूनच राज्यात परराज्यातून बाजरी आणली जाते. सध्या स्थितीला राजस्थान गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बाजरी आणली जात आहे. बाजरीचे वधारलेले दर शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर आहेत हा तर विश्लेषणाचा भाग आहे. मात्र, यामुळे मजूर वर्गाची भाकर करपण्याची व हॉटेल व्यवसायिकांची भाकर कडकण्याची दाट शक्यता आहे.
Published on: 16 January 2022, 01:12 IST