News

या बैठकीत दूध अनुदान, कापूस सोयाबीन दर अशा विविध प्रश्नांवर देखील चर्चा करण्यात आली. सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या आंदोलनाची पुढील दिशा आता गनिमीकाव्याने असणार आहे. कोणत्याही क्षणी, कोणत्याही ठिकाणी आक्रमक आंदोलनाला सुरुवात होईल.

Updated on 24 December, 2023 10:31 AM IST

Milk Rate : राज्य सरकारने प्रति लिटर ५ रुपये अनुदान दूध उत्पादकांना दिले. पण हे अनुदान फक्त सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच आहे. परंतु या अनुदानासाठी खाजगी दूध संघाचा विचार केलेला नाही. खाजगी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे खाजगी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा कुठलाही फायदा होणार नाही, त्यांना कमी दर मिळून त्यांचे मोठे नुकसान होणार आहे, त्यामुळे सरकारने याबाबत लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

अकलूज (ता.माळशिरस जि.सोलापूर) येथे विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी तसेच शेती प्रश्नावर लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसोबत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. सरकारने प्रति लिटर ३४ रुपये दराच्या खाली दूधाची खरेदी होवू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी सरसकट शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. तसेच पशू खाद्याचे दर नियंत्रित करावेत, या मागण्या या बैठकीत करण्यात आल्या. पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. लवकरच दूध उत्पादकांना घेवून मोठे आंदोलन उभारण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

या बैठकीत दूध अनुदान, कापूस सोयाबीन दर अशा विविध प्रश्नांवर देखील चर्चा करण्यात आली. सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या आंदोलनाची पुढील दिशा आता गनिमीकाव्याने असणार आहे. कोणत्याही क्षणी, कोणत्याही ठिकाणी आक्रमक आंदोलनाला सुरुवात होईल. तसेच ठिक-ठिकाणी मेळावे घेवून शेतकऱ्यांना फसविणाऱ्या सरकार व नेत्यांची पोलखोल करणार आहे,असं देखील तुपकर म्हणाले.

दरम्यान, सोयाबीन-कापूस उत्पादक अडचणीत सापडला असतांना त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? आंदोलन करायचे नाही का? सरकारला जवाबही विचारायचा नाही का?, असे विविध प्रश्न देखील यावेळी तुपकर यांनी उपस्थित केले आहेत.

English Summary: Milk Subsidy Farmers supplying milk to private milk unions will not benefit from subsidy ravikant tupkar
Published on: 24 December 2023, 10:31 IST