कोल्हापूर : दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दोन रुपये दरवाढीसह गोकुळच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेली आश्वासने दोन महिन्यांत पूर्ण केली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी दिली.
पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज नूतन संचालकांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी संचालकांनी त्यांचा सत्कार केला. पालकमंत्री पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघाची प्रतिष्ठा वाढवू. चार उमेदवारांच्या पराभवाची कारणमीमांसाही तपासली जाईल. दूध संस्था प्रतिनिधी, सचिव हे संस्थांच्या व उत्पादकांच्या समस्या घेऊन ताराबाई पार्क कार्यालयात येत असतात.त्याच्या सोडवणुकीसाठी दररोज दोन ते तीन संचालक कार्यालयात उपस्थित राहून अडचणी जागीच सोडवतील.
खासदार संजय मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने, विनय कोरे, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, राजू आवळे, जयंत आसगांवकर, ऋतुराज पाटील आदी आमदार, विश्वास पाटील, अरुणराव डोंगळे, नवीद मुश्रीफ, नंदकुमार ढेंगे आदी नूतन संचालक उपस्थित होते.मंत्री मुश्रीफ म्हणाले, १४ लाख लिटर दररोजचे गोकुळचे दूध संकलन २० लाखांवर नेण्यासाठी प्रयत्न करू. दुधाला लिटरला दोन रुपयांची दरवाढ, पारदर्शक कारभार, काटकसर, पशुखाद्यासह पशुवैद्यकीय व इतर दर्जेदार सेवांचा पुरवठा, वासाच्या दुधाची समस्या यासाठी वचनबद्ध आहोत. गोकुळ दूध संघ देशात २७ व्या स्थानावर आहे. तो अमूलच्या बरोबरीने चांगला चालवून दाखवू.
गोकुळ निवडणुकीतील विजयानंतर नूतन संचालकांनी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य नेत्यांचा सत्कार केला.
मनोहर पाटील
प्रतिनिधी गोपाल उगले
Published on: 11 May 2021, 06:11 IST