मोदी सरकारने अमेरिकेच्या दुग्ध उत्पादनासाठी देशाची बाजारपेठ खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दूध उत्पादकांना मोठं नुकसान होणार असल्याने राज्याच्या दुग्ध उद्योग क्षेत्रातून टीका होत आहे. आयातीचा निर्णय तात्काळ रद्द केला नाहीतर आधीच कोलमडलेला देशातील दूध उद्योग आणखी अडचणीत येईल, अशी भाती क्षेत्रातील तज्ञ शेतकरी आणि संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. देशात सध्या दुधाचे अतिरिक्त उत्पादन होत आहे, महाराष्ट्रात तर अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेला दुधाच्या भुकटीचा दोन लाख टनांचा साठा शिल्लक आहे.
त्यातच लॉकडाऊनमुळे मागणी घटल्याने सहकारी आणि खासगी संघांपुढे शिल्लक दुधाचे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान तोटा कमी व्हावा यासाठी संघांनी काही दिवसांपासून दुधाच्या खरेदी दरात घट सुरु केली आहे, याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी दूध दर वाढवून द्यावा व त्यासाठी सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी करत राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. अशातच केंद्र सरकारने अमेरिकी डेअरी उद्योगाला देशाची बाजारपेठ खुली करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे दुग्ध उत्पादकांचे नुकसान करणारा ठरणार आहे, अशा प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत.
दरम्यान राज्याचे माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टीवर तोफ डागत देशाच्या बाजारात एक ग्रॅम पावडरही येणार नसल्याचे सांगितले. दूध पावडरचा तयार झालेला प्रश्न हा जागतिक बाजाराशी निगडीत आहे. तो समजून न घेता आयातीचा बागुलबुवा उभा करुन शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याची खेळी राजू शेट्टी खेळत असल्याचे खोत म्हणाले. आपण स्वत केंद्रीय मंत्र्यांशी बोललो असून एक ग्रॅम देखील पावडर येणार नाही. त्यामुळे पावडर आयातीचा मुद्दा पुढे करुन शेतकऱ्यांना दरवाढ देण्याचा मुख्य मु्द्दा बाजूला फेकण्याचा प्रयत्न थांबवावा असे खोत म्हणाले.
Published on: 23 July 2020, 07:30 IST